Join us

मुंबईतील दैनंदिन रुग्णसंख्या ५००च्या उंबरठ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2021 4:08 AM

मुंबई : मुंबईत रविवारी ४९६ रुग्णांची नोंद झाली असून, २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. २३७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला ...

मुंबई : मुंबईत रविवारी ४९६ रुग्णांची नोंद झाली असून, २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. २३७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा ७ लाख ४६ हजार ३४६वर पोहोचला आहे, तर मृतांचा आकडा १५ हजार ९९३वर गेला आहे. शहर उपनगरात रुग्ण बरे होणाऱ्यांची संख्या ७ लाख २४ हजार ७७वर पोहोचली आहे.

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के आहे. मुंबईत २४ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.०५ टक्के असल्याची नोंद आहे. शहर उपनगरात रुग्ण दुप्पट होण्याचा काळ १ हजार ३६३ दिवसांवर येऊन ठेपला आहे.

मुंबई चाळ आणि झोपडपट्टीच्या परिसरात एकही प्रतिबंधित क्षेत्र नाही. रुग्ण आढळून आल्याने ४४ इमारती सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी ४३ हजार ११७, तर आतापर्यंत एकूण ९४ लाख ३२ हजार ९५९ चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

आठ महिन्यांत चार लाखांहून अधिक रुग्ण

गेल्या १ जानेवारी ते ३१ ऑगस्ट २०२१ या ८ महिन्यांच्या कालावधीत विविध रुग्णालयात दाखल कोरोनाच्या ४ लाख २५ हजार १३९ रुग्णांची नोंद झाली असून, ४ हजार ८२७ रुग्णांचा बळी गेला आहे. कोरोना रुग्णांचा मृत्यू दर १.१३ एवढा नोंदवला गेला आहे. जर या आकडेवारीवरून सरासरी काढल्यास दर महिन्याला कोरोनाचे सरासरी ५३ हजार १४२ रुग्ण आढळून आले आहेत. तर दररोज सरासरी १ हजार ७७१ रुग्ण आढळून आले आहेत.

कोरोनामुळे मृत पावलेल्या रुग्णांची संख्या पाहता दर महिन्याला कोरोनाचे सरासरी ६०३ बळी गेले आहेत, तर दररोज सरासरी २० बळी गेले आहेत. १ जानेवारी ते ३१ ऑगस्ट या ८ महिन्यांच्या कालावधीत कोरोनाचे सर्वाधिक २ लाख १४ हजार ९८५ रुग्ण हे एप्रिल महिन्यात, तर सर्वात कमी म्हणजे ७ हजार ९६४ रुग्ण हे ऑगस्ट महिन्यात आढळून आले आहेत. त्याचप्रमाणे, गेल्या ८ महिन्यात कोरोनाचे सर्वात जास्त १ हजार ९३४ बळी हे एप्रिल महिन्यात गेले असून, सर्वात कमी १०५ बळी हे ऑगस्ट महिन्यात गेले आहेत.