राज्यातील काेराेनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत २२ टक्क्यांनी वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2021 06:49 AM2021-03-07T06:49:00+5:302021-03-07T06:49:31+5:30
मुंबईत शनिवारी १,१८८ रुग्ण आणि ५ मृत्यूंची नोंद झाली
मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यासह मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे; परिणामी, दैनंदिन रुग्णसंख्येत २२ टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली. मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी अकराशेहून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली. कोरोना नियंत्रणासाठी गौरविलेल्या धारावीमध्येही पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. मुंबईतील एकूण रुग्णसंख्या ३ लाख ३१ हजार १६ वर गेली आहे. तर सध्या मुंबईत १०,४६९ सक्रिय रुग्ण आहेत.
४ मार्चच्या आकडेवारीनुसार धारावीत ७३ सक्रिय रुग्ण आढळले. त्यामुळे येथे कठोर उपाययोजनांचा अवलंब पुन्हा केला जात आहे. पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्या १५ ते २० जणांना क्वारंटाईन केले जात आहे. डॉ. गौतम भन्साळी यांनी सांगितले की, रुग्णसंख्यावाढीविषयी चिंता करण्याचे कारण नाही. ही कोरोनाची दुसरी लाट आहे असे म्हणण्यासाठी आणखी १० ते १२ दिवस जावे लागतील. सध्याची रुग्णवाढ अनलॉकच्या टप्प्यामुळे झाली आहे.
चिंता कायम; राज्यात रुग्णसंख्या १० हजारांपुढे
nराज्यात काेराेनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येचा आलेख आठ ते नऊ हजारांच्या वर गेला आहे. त्यामुळे राज्य शासनासमोर पुन्हा एकदा संसर्ग नियंत्रणाचे आव्हान उभे राहिले आहे. राज्यात शनिवारी १०,१८७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून, ४७ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली.
nराज्यातील काेरोनाबाधितांची संख्या २२,०८,५८६ झाली असून, बळींचा आकडा ५२,४४० झाला आहे. दिवसभरात ६,०८० रुग्ण बरे होऊन घरी गेले असून एकूण २०,६२,०३१ रुग्ण काेराेनामुक्त झाले. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.३६ टक्के असून सध्या ९२,८९७ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली.
nआजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,६७,७६,०५१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १३.१७ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४,२८,६७६ व्यक्ती होमक्वारंटाइन, तर ४,५१४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
मुंबईत १,१८८ नवे रुग्ण
मुंबईत शनिवारी १,१८८ रुग्ण आणि ५ मृत्यूंची नोंद झाली. परिणामी, बाधितांची संख्या ३ लाख १९ हजार ८८८ झाली असून, मृतांचा आकडा ११ हजार ४४६ झाला. दिवसभरात १,२५३ रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत ३ लाख ९ हजार ४३१ रुग्ण कोरोनामुक्त झाले. रुग्ण दुपटीचा कालावधी २३७ दिवसांवर पोहोचला आहे. गेल्या ३३ दिवसांत मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी ३२३ दिवसांनी कमी झाला आहे. तर याच कालावधीत सक्रिय रुग्णांची संख्या ४,८०३ ने वाढली.