राज्यातील काेराेनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत २२ टक्क्यांनी वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:07 AM2021-03-07T04:07:04+5:302021-03-07T04:07:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यासह मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे; परिणामी दैनंदिन रुग्णसंख्येत २२ टक्क्यांनी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यासह मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे; परिणामी दैनंदिन रुग्णसंख्येत २२ टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली.
मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी अकराशेहून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली. कोरोना नियंत्रणासाठी गौरविलेल्या धारावीमध्येही पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. मुंबईतील एकूण रुग्णसंख्या ३ लाख ३१ हजार १६ वर गेली आहे. तर सध्या मुंबईत १० हजार ४६९ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. ४ मार्चच्या आकडेवारीनुसार धारावीत ७३ सक्रिय रुग्णांची नोंद झाली. या पार्श्वभूमीवर येथे पुन्हा कठोर उपाययोजनांचा अवलंब केला जात आहे. मोबाइल व्हॅनच्या माध्यमातून कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. तर एका पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्या १५ ते २० जणांना क्वारंटाइन केले जात आहे.
रुग्णसंख्येतील वाढीबद्दल अधिक माहिती देताना डॉ. गौतम भन्साळी यांनी सांगितले की, रुग्णसंख्यावाढीविषयी चिंता करण्याचे कारण नाही. राज्यात ही कोरोनाची दुसरी लाट आहे असे म्हणण्यासाठी आणखी दहा ते बारा दिवस जावे लागतील. सध्याची रुग्णवाढ अनलॉकच्या टप्प्यामुळे झाली आहे. या पुढील दोन आठवडे रुग्णसंख्येचे विश्लेषण करणे गरजेचे आहे.
.............................