लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शहर उपनगरातील कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता मुंबई पालिका प्रशासनासह राज्य शासनसुद्धा सतर्क झाले आहे. दिवसागणिक मुंबईकरांच्या चिंतेत भर पडत असल्याचे दिसून येत आहे. शहर उपनगरात बुधवारी १ हजार १६७ रुग्ण आणि ४ मृत्यूंची नोंद झाली आहे. मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या ३ लाख २१ हजार ६९८ झाली असून, मृतांचा आकडा ११ हजार ४५३ झाला आहे. सध्या ८ हजार ३२० सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईतील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लाॅकडाऊनचे सावट गडद करत आहे.
मुंबईत दिवसभरात ३७६ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत ३ लाख १ हजार ५७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ९४ टक्के असून, १७ ते २३ फेब्रुवारीपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.२४ टक्के आहे. तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी २९४ दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईत आतापर्यंत कोरोनाच्या ३१ लाख ८५ हजार ३३४ चाचण्या झाल्या आहेत.
शहर उपनगरात झोपडपट्ट्या आणि चाळीच्या वस्तीत सक्रिय कंटेनमेंट झोन्सची संख्या ५१ असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या ८१५ इतकी आहे. मागील २४ तासांत पालिकेने रुग्णांच्या सहवासातील ६ हजार ७३ अतिजोखमीच्या रुग्णांचा शोध घेतला आहे.
असा वाढला रुग्णांचा आलेख
२४ फेब्रुवारी – १ हजार १६७
२३ फेब्रुवारी - ६४३
२२ फेब्रुवारी – ७६०
२१ फेब्रुवारी - ९२१