लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत शुक्रवारी पुन्हा घट दिसून आली. शुक्रवारी ३७४ नवीन रुग्णांची नोंद झाली असून गेल्या काही महिन्यांमधील ही सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. यामुळे रुग्णवाढीचा सरासरी दैनंदिन दर ०.०५ टक्के एवढा खाली आला आहे. रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधीही आता १२०९ दिवसांवर पोहोचला आहे. दिवसभरात आठ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आतापर्यंत मुंबईत सात लाख ३३ हजार ११५ रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी सात लाख नऊ हजार १९८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच १५ हजार ७५७ रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे. सध्या पाच हजार ७७९ सक्रिय रुग्ण आहेत. शुक्रवारी मृत्युमुखी पडलेल्या आठ रुग्णांपैकी दोन रुग्णांना सहव्याधी होत्या. मृतांमध्ये सहा पुरुष, तर दोन महिला रुग्णांचा समावेश होता. यापैकी पाच मृत झालेले रुग्ण ६० वर्षांवरील होते, तर उर्वरित तीन रुग्ण ४० ते ६० वर्षांमधील होते. दिवसभरात २७ हजार १३१ कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत, तर आतापर्यंत ७८ लाख ९८ हजार ७०८ चाचण्या करण्यात आल्या आहेत. ९७ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.