Join us

मुंबई विमानतळावर दररोज १८ हजार युनिट सौरऊर्जेचा वापर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2022 11:55 AM

मुंबई विमानतळाची हरितऊर्जा कार्यक्षमता लक्षात घेऊन ‘इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल’ने (आयजीबीसी) आंतरराष्ट्रीय टर्मिनल (टी२) इमारतीला ‘प्लॅटिनम रेटेड ग्रीन एक्झिस्टिंग बिल्डिंग प्रोजेक्ट’ पुरस्काराने (२०२१ ते २०२४) सन्मानित केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : पारंपरिक ऊर्जास्रोतांचा वापर कमी करून अपारंपरिक ऊर्जेकडे वळण्याचे आवाहन वारंवार केले जात असताना मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाने प्रत्यक्ष कृतीतून ते साध्य करून दाखविले आहे. सध्या मुंबई विमानतळावर दररोज १८ हजार युनिट सौरऊर्जेचा वापर होत असून, वार्षिक वीजवापर ६.५ दशलक्ष युनिटच्या खाली आणण्यात यश मिळाले आहे.

मुंबई विमानतळाची हरितऊर्जा कार्यक्षमता लक्षात घेऊन ‘इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल’ने (आयजीबीसी) आंतरराष्ट्रीय टर्मिनल (टी२) इमारतीला ‘प्लॅटिनम रेटेड ग्रीन एक्झिस्टिंग बिल्डिंग प्रोजेक्ट’ पुरस्काराने (२०२१ ते २०२४) सन्मानित केले आहे. सलग दुसऱ्यांदा हा बहुमान पटकावण्याची किमया मुंबई विमानतळाने साध्य केली आहे. दैनंदिन कामकाजात पर्यावरणपूरक पद्धतींचा अवलंब करणाऱ्या इमारतींचा सन्मान याअंतर्गत केला जातो.

 

पारंपरिक ऊर्जास्रोतांच्या रक्षणासाठी

- ५ लाख ३१ हजार १४१ किलोवॅट प्रतितास क्षमतेचा सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प.

- दैनंदिन कामकाजात १८ हजार युनिट सौरऊर्जेचा वापर.

- विमानतळावर वापरल्या जाणाऱ्या एकूण ऊर्जेमध्ये सौरऊर्जेचा वाटा ६.६ टक्के.

- त्यामुळे वार्षिक वीजवापर ६.५ दशलक्ष युनिटच्या खाली आणण्यात यश.

 

ऊर्जाबचत कशी करतात?

- संपूर्ण बाह्य प्रकाशयोजनेत ‘लायटिंग फिक्स्चर्स’च्या जागी ‘एलईडी फिक्स्चर्स’ बसवण्यात आल्यामुळे विमानतळावरील ऊर्जावापराचा भार कमी करण्यात मदत झाली आहे.

- एअर हॅण्डलिंग युनिटस्मध्ये (एएचयू) बेल्टद्वारे चालणाऱ्या पंख्यांच्या जागी ‘ईसी फॅन’ बसविल्यामुळे ऊर्जा कार्यक्षमता सुधारली आहे. शिवाय देखभाल-दुरुस्तीचा कालावधीही वाढला आहे.

- टर्मिनल दोनवर मोक्याच्या ठिकाणी ‘वाय-फाय एनेबल्ड’ आणि ‘आयओटी’वर आधारित तापमान संवेदक बसवण्यात आले आहेत. यामुळे संपूर्ण इमारतीतील तापमानावर नियंत्रण ठेवता येते.

 

- दरवर्षी १३ दशलक्ष युनिट विजेची बचत

- २ मेगावॅट भार कमी करण्यात यश

 

पाण्यावर होते प्रक्रिया

‘झीरो-वॉटर डिस्चार्ज धोरणां’तर्गत पाण्यावर पुनर्प्रक्रिया करण्यासाठी मुंबई विमानतळाने विशेष यंत्रणा विकसित केली आहे. या पाण्याचा वापर बागकामासह अन्य कामांसाठी केला जातो. पावसाचे पाणी साठवण्यासाठी २६ लाख लिटर क्षमतेच्या टाक्या बसविण्यात आल्या आहेत. शिवाय २२९ वर्षाजल नियोजन खड्डे खोदण्यात आले आहेत.

या घटकांना प्राधान्य

- कार्बन व्यवस्थापन प्रणाली

- अपारंपरिक ऊर्जानिर्मिती प्रकल्प

- पाण्याचा पुनर्वापर

- प्रभावी कचरा व्यवस्थापन प्रणाली

टॅग्स :विमानतळ