Join us

दख्खनचा राजा आता मुंबईत!

By admin | Published: April 12, 2016 1:41 AM

‘दख्खनचा राजा’ म्हणून प्रसिद्ध असलेले कोल्हापूरच्या डोंगरातील ‘श्रीजोतिबा’ देवस्थानाची प्रतिकृती घाटकोपरमधील पंतनगरमध्ये साकारण्यात आली आहे. रविवारी या मंदिराची वास्तुशांती

मुंबई : ‘दख्खनचा राजा’ म्हणून प्रसिद्ध असलेले कोल्हापूरच्या डोंगरातील ‘श्रीजोतिबा’ देवस्थानाची प्रतिकृती घाटकोपरमधील पंतनगरमध्ये साकारण्यात आली आहे. रविवारी या मंदिराची वास्तुशांती करून श्रीजोतिबांच्या मूर्तीची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर, रात्रभर मूर्तीवर अधिवास विधी केल्यानंतर सोमवारी मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. कोल्हापूर जिल्हा रहिवाशी सेवा संघाने लोकवर्गणीतून हे श्रीजोतिबा मंदिर साकारले आहे. देवस्थान समितीच्या संचालक मंडळावरील सचिन पाटील यांनी सांगितले की, ‘शासनाच्या सर्व परवानग्या घेऊन हे मंदिर उभारण्यात आले आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली आणि कोकण प्रांतात अनेकांचे देवस्थान हे कोल्हापूरचा जोतिबा आहे. मात्र, नोकरी आणि शिक्षणानिमित्त ग्रामीण भागातील हा भक्तगण मुंबईसह नवी मुंबई, ठाणे परिसरात वास्तव्यास आहेत. प्रत्येक पौर्णिमेला कोल्हापूरच्या जोतिबा मंदिरात दर्शन घेण्यासाठी या भक्तांना जाणे शक्य होत नाही. शिवाय, जे वेळ काढून जातात, त्यांना पौर्णिमेला जोतिबाच्या मंदिरात होणाऱ्या अलोट गर्दीमुळे योग्य दर्शन घेता येत नाही. परिणामी, भाविकांची हीच अडचण ओळखून प्रति पंढरपूर, प्रति शिर्डीप्रमाणे प्रति जोतिबा मंदिर साकारण्याची संकल्पना कोल्हापूर जिल्हा रहिवाशी सेवा संघाने प्रत्यक्षात उतरवली आहे.जोतिबांच्या कोल्हापूरमधील मंदिराप्रमाणेच घाटकोपरच्या पंतनगरमधील मंदिर उभारण्यात आले आहे. शिवाय, जोतिबांची मूर्तीही कोल्हापूरला तयार करण्यात आलेली आहे. रविवारी रमाबाईनगर ते प्रति श्रीजोतिबा मंदिरपर्यंत श्रींची मूर्ती आणि कळस घेऊन भव्य मिरवणूक काढण्यात आली. (प्रतिनिधी)मिरवणुकीत पुणेरी ढोल, दिंडी, लेजीम आणि दांड पट्टा असे विविध आकर्षण या वेळी भक्तांना पाहायला मिळाले. सोमवारी सर्व विधी पूर्ण करत सोहळा पूर्ण झाल्यानंतर, भाविकांना जोतिबाचे दर्शन खुले करण्यात आले आहे.