मुंबई - दलित पँथरचे संस्थापक आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार ज्येष्ठ विचारवंत नेते राजा ढाले यांचे आज सकाळी विक्रोळी येथील निवासस्थानी दुःखद निधन झाले. राजा ढाले यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आंबेडकरी चळवळीचा भाष्यकार, मार्गदर्शक, दलित पँथरचा महानायक हरपला असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
राजा ढाले यांची अंत्ययात्रा उद्या बुधवारी दि. 17 जुलै रोजी दुपारी 12 वाजता विक्रोळी पूर्वेतील त्यांच्या निवासस्थानाहून सुरू होऊन दादर चैत्यभूमी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. राजा ढाले यांचे पार्थिव गोदरेज रुग्णालय येथे नेण्यात येत असल्याची माहिती त्यांची कन्या गाथा ढाले यांनी दिली आहे.
राजा ढाले यांच्या निधनाची दुःखद वार्ता कळताच आंबेडकरी जनतेत तीव्र दुःख व्यक्त करण्यात येत आहे. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राजा ढाले यांच्या निधनाची वार्ता कळताच तीव्र शोक व्यक्त केला आहे. तर आंबेडकर चळवळीत राजा ढाले यांचा महत्वाचा वाटा होता. त्यांच्या जाण्याने चळवळीत मोठी पोकळी निर्माण झाली असल्याची भावना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली.
राजा ढाले हे भारिप बहुजन महासंघाच्या तिकिटावर १९९९ सालच्या लोकसभेच्या निवडणुकीत उत्तर-मुंबई मतदारसंघातून उभे होते, पण निवडून आले नाहीत. २००४ साली यांनी त्याच पक्षाकडून ईशान्य मुंबई मतदारसंघातूनही एक अयशस्वी निवडणूक लढवली.