Join us

दलित पँथरचा ‘राजा’ हरपला; राजा ढाले काळाच्या पडद्याआड

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 6:27 AM

‘दलित पँथर’चे संस्थापक सदस्य, आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार आणि ज्येष्ठ विचारवंत राजा ढाले यांचे मंगळवारी आकस्मिक निधन झाले.

मुंबई : ‘दलित पँथर’चे संस्थापक सदस्य, आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार आणि ज्येष्ठ विचारवंत राजा ढाले यांचे मंगळवारी आकस्मिक निधन झाले. विक्रोळी येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. ते ७८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी दीक्षा, कन्या गाथा आणि नातू असा परिवार आहे. सत्तरीच्या दशकात पँथरच्या माध्यमातून विद्रोही साहित्याची धग समाजापर्यंत पोहोचविणाऱ्यांत राजा ढाले यांचे नाव आघाडीवर होते.मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास घरातच कोसळून त्यांचा मृत्यू झाला. सध्या त्यांचे पार्थिव राजावाडी रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. बुधवारी सकाळी दहा वाजता विक्रोळीतील टागोरनगर येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे. दुपारी १२ वाजता अंत्ययात्रेला सुरुवात होणार असून, दादर चैत्यभूमी येथील विद्युतदाहिनीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती गाथा ढालेयांनी दिली. सकल मानवजातीच्या दृष्टीने व्यापक बौद्ध तत्त्वज्ञानाची त्यांनी मांडणी केली. फुले-आंबेडकरी विचारसरणीचे साठोत्तर कालखंडातील एक महत्त्वाचे नेते अशी त्यांची ओळख आहे. लेखक, कवी, अनुवादक, समीक्षक, संशोधक, विचारवंत, लघू नियत-अनियतकालिकांचा निर्माता, संपादक असे त्यांचे भरीव योगदान आहे. पँथर चळवळीच्या विस्तारात ढाले यांची बौद्धिक भूमिका महत्त्वाची ठरली. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या दलित चळवळीला नवीन आयाम देणारा ऐतिहासिक पँथर वणवा गावखेड्यापर्यंत नेण्यात राजा ढाले, नामदेव ढसाळ, ज.वि. पवार, भाई संगारे, अविनाश महातेकर हे पाच नेते आघाडीवर होते. या पाच धगधगत्या निखाऱ्यांपैकी भाई संगारे, नामदेव ढसाळ यांच्यानंतर राजा ढाले यांच्या निर्वाणाने तिसरा निखारा आज विझला, अशी भावना आंबेडकरी चळवळीत व्यक्त होत आहे.राजा ढाले यांनी भारिप बहुजन महासंघाच्या तिकिटावर १९९९ साली लोकसभा निवडणूक लढविली. उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेना उमेदवार मनोहर जोशी यांच्याविरोधात त्यांनी सव्वा लाख मते घेतली होती. २००४ साली त्यांनी भारिपकडूनच ईशान्य मुंबईतून निवडणूक लढविली. या दोन्ही निवडणुकांत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.>राजा ढाले यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आंबेडकरी चळवळीचा भाष्यकार, मार्गदर्शक, दलित पँथरचा महानायक हरपला आहे.- रामदास आठवले,केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री