मुंबई : ‘एनआरआय’कडे घरकाम करणाऱ्या महिलेने जवळपास २२ लाखांचा ऐवज लंपास केला. गोरेगावमध्ये हा प्रकार घडला असून, बांगुर नगर पोलिसांनी याप्रकरणी मंगळवारी रजिता मेंगू (३२) या मोलकरणीला अटक करत १९ लाखांचा ऐवज तेलंगणा या तिच्या गावातून हस्तगत केला आहे. पोटच्या मुलीमुळेच तिची चोरी पकडली गेली आणि ती पोलिसांच्या तावडीत सापडली.
रमणी अय्यर (६०) हे त्यांची पत्नी व त्यांच्या ८३ वर्षीय आईसोबत बांगुर नगरमध्ये राहतात. त्याच परिसरात त्यांचा एनआरआय लहान भाऊ कुमार सुब्रमण्यम अय्यर यांचे घर आहे. एरव्ही कामानिमित्त परदेशात राहणारे कुमार सध्या मुंबईत वास्तव्याला होते. त्यामुळे त्यांनी घरकामासाठी दोन नोकर ठेवले होते. ज्यापैकी मेंगू दोन्ही घरात काम करायची आणि त्यांच्या मौल्यवान वस्तू कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवल्याची तिला माहिती होती. कुमार यांनी मार्च महिन्यात काही कागदपत्रे काढण्यासाठी लॉकर उघडले, तेव्हा त्यात सर्व मौल्यवान वस्तू नीट ठेवल्या होत्या. मात्र, पुन्हा २९ जून दरम्यान त्यांनी पुन्हा काही कामासाठी तो लॉकर पाहिला, तेव्हा त्यातील सोन्याची बिस्किटे, दागिने असा २१ लाख ५० हजारांचा ऐवज गायब होता. कुमार यांनी घरच्यांसह दोन्ही नोकरांना याबाबत विचारले. तेव्हा त्याबाबत काही माहीत नसल्याचे मेंगूने सांगितले.
पोलिसांच्या चौकशीतदेखील ‘मी एप्रिलमध्ये गावी गेले होते आणि नुकतीच परतले आहे’, असे उत्तर तिने दिले. मात्र, अय्यरच्या आईने तिच्या मुलीला गावी जाऊन काय मज्जा केली, असे सहज विचारले. तेव्हा खूप मज्जा केली. माझ्या आईने आज्जीसाठी आणि माझ्यासाठी नवीन सोनसाखळी घेतली, असे उत्तर दिले. तसेच तिने स्वतःच्या घराच्या दुरुस्तीचे कामही काढले, त्यावरून त्यांचा संशय वाढला. नंतर त्याबाबत पोलिसांना समजले आणि त्यांनी मेंगूला पोलिसी खाक्या दाखवताच तिने गुन्हा कबुल केला. तेव्हा तिच्या तामिळनाडू येथील घरातून १९ लाखांचे सोने हस्तगत करण्यात आले.