मुंबई : मुंबईच्या नालेसफाईतील भ्रष्टाचाराच्या चिखलात भाजपा नेत्यांचेही हात काळे झाले आहेत. या घोटाळ्याला शिवसेनेइतकीच भाजपाही जबाबदार आहे. त्यामुळे नालेसफाईची चौकशी करा म्हणणाऱ्या भाजपाने आधी पालिकेच्या सत्तेतून बाहेर पडावे, असा टोला राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी लगावला. नालेसफाईवरून भाजपा नेते दुटप्पी भूमिका घेत असल्याची टीका करताना अहिर म्हणाले की, या प्रकरणी भाजपा नेते नामानिराळा राहण्याचा प्रयत्न करीत असले तरी महापालिकेतील सत्तेत भाजपाही सहभागी आहे. शिवसेनेवर भ्रष्टाचाराचे खापर फोडण्याची भाजपाची खेळी मुंबईकरांच्या डोळ्यांत धूळ फेकण्याचा प्रकार असल्याचेही अहिर म्हणाले. भ्रष्टाचारप्रकरणी भाजपाला कारवाई करायची असेल तर राज्य सरकार त्यांचेच आहे. मुख्यमंत्र्यांकडे मागणी करून नालेसफाईतल्या भ्रष्टाचाराला जबाबदार अधिकारी, राजकीय नेते आणि कंत्राटदारांवर कठोर कारवाई करावी. मात्र त्याआधी महापालिकेच्या सत्तेतून बाहेर पडावे, एकीकडे सत्तेचा मलिदा खायचा आणि दुसरीकडे भ्रष्टाचाराच्या विरोधात असल्याचा आव आणायचा हे दुतोंडी राजकारण आता बंद करा, असा इशाराही अहिर यांनी दिला. सत्ताधाऱ्यांचे पितळ उघडेनालेसफाईतील कंत्राटात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी केवळ आपल्या मागणीमुळेच झाली असून, या घोटाळ्याशी संबंध नसल्याचा दावा भाजपाकडून केला जात आहे. मात्र महापालिका आयुक्तांनी केलेल्या चौकशीत सत्ताधाऱ्यांचे पितळ उघडे पडले आहे.
नालेसफाईवरून दुटप्पी राजकारण
By admin | Published: September 15, 2015 2:45 AM