Join us

पावसाअभावी धरणक्षेत्रे तहानलेली! मुंबईकरांवरील पाणीसंकट गडद होण्याची भीती  

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2024 9:39 AM

मुंबईत वरुणराजाने उघडीप दिली असली, तरी मुंबईला पाणीपुरवणाऱ्या धरणांच्या क्षेत्रात मात्र तो तुरळक बरसतो आहे.

मुंबई :मुंबईत वरुणराजाने उघडीप दिली असली, तरी मुंबईला पाणीपुरवणाऱ्या धरणांच्या क्षेत्रात मात्र तो तुरळक बरसतो आहे. त्यामुळे धरणांतील पाणीसाठा ५.४२ टक्के इतकाच आहे. येत्या काही दिवसांत सातही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाला नाही तर मुंबईवरील पाणीकपातीचे संकट आणखी गडद होण्याची भीती आहे.

गेल्या काही दिवसांत तुळशी तलावाच्या क्षेत्रात १४४ मि.मी., विहार १६५ मि.मी. पाऊस झाला, तर भातसात ११४ मि.मी., मध्य वैतरणात १०१ मि.मी., मोडकसागर ७८ मि.मी., तानसा ८८ मि.मी. आणि अप्पर वैतरणा परिसरात सर्वांत कमी म्हणजे ४२ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली. 

मुंबईची रोजची पाण्याची गरज ३,८५० दशलक्ष लिटर, तर ठाणे, भिवंडी महापालिकेची १५० दशलक्ष लिटर आहे. ठाणे, पालघर, नाशिक जिल्हा परिसरातील अप्पर वैतरणा, तानसा, मोडकसागर, मध्य वैतरणा आणि भातसा हे प्रमुख पाच जलाशय पाण्याची गरज भागवतात. त्यामुळे हे पाच तलाव आणि मुंबई उपनगर परिसरातील तुळशी आणि विहार हे दोन तलाव असे एकूण सात तलाव पावसाळ्याच्या शेवटपर्यंत म्हणजे १ ऑक्टोबरपर्यंत भरलेले (१४,४७,३६३ दशलक्ष लिटर) असणे आवश्यक असते. 

१) ३,८५० दशलक्ष लिटर मुंबईतील नागरिकांची रोजची पाण्याची गरज आहे.

२) १४,४७,३६३दशलक्ष लिटर सात तलाव पावसाळ्याच्या शेवटपर्यंत म्हणजे १ ऑक्टोबरपर्यंत भरणे आवश्यक आहे.

चांगला पाऊस -

१)  रविवारी सकाळी सहापर्यंतच्या नोंदीनुसार सध्या सात तलावांत फक्त ७८,४९९ दशलक्ष लिटर (५.४२ टक्के) इतका म्हणजे पुढील २० दिवस (१ जुलैपर्यंत) पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे. 

२)  येत्या काही दिवसांत चांगला पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे; परंतु धरणांच्या क्षेत्रात जोरदार पावसाची आवश्यकता आहे. 

टॅग्स :मुंबईपाणीकपातपाणी टंचाई