Join us

धरणातील साठा १८ टक्क्यांवर ...! राखीव साठ्यामुळे मुंबईकरांना मिळाला दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2023 1:18 PM

पाणीसाठ्यात वाढ झाल्यामुळे मुंबईकरांना निश्चित दिलासा मिळाला असला तरी येत्या काही दिवसांत पाणी कपातीसंदर्भात पालिका निर्णय घेणार का? याकडेही लक्ष आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील साठा कमी झाल्यामुळे राखीव साठा वापरण्यास राज्य सरकारने परवानगी दिल्यानंतर आता पाणीसाठा वाढला आहे. सध्या सातही धरणांत ११ टक्के पाणीसाठा असला तरी राखीव साठा धरून १८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. पाणीसाठ्यात वाढ झाल्यामुळे मुंबईकरांना निश्चित दिलासा मिळाला असला तरी येत्या काही दिवसांत पाणी कपातीसंदर्भात पालिका निर्णय घेणार का? याकडेही लक्ष आहे.

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी अशा सातही धरणांत मिळून सध्या केवळ ११.१४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. धरणातील साठा वेगाने कमी होत असल्यामुळे पुरेसा पाऊस पडेपर्यंत पाणी पुरवावे लागणार आहे. मात्र, सध्या असलेला पाणीसाठा हा केवळ २५ जूनपर्यंत पुरेल इतकाच आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही पालिका प्रशासनाने राखीव साठा वापरण्याकरिता सरकारकडे आधीच पत्र पाठविले होते.

सध्याची पाण्याची तलावातील स्थिती (टक्केवारीत)

अप्पर वैतरणा (राखीव साठा) ८२.६७%, भातसा (राखीव साठा) १००%, सध्या सात तलावांतील पाणीसाठा (राखीव साठा) १८.६७%.

७ जूनपर्यंत तलावातील पाणीसाठा (टक्केवारीत)

तलावातील पाणीसाठा    २०२३    २०२२    २०२१ अप्पर वैतरणा    ०    ०    ० मोडक सागर    २४    ३५    ३१.८२ तानसा    २२.३७    ७.८७    १२.४२ मध्य वैतरणा    १२.८२    १५.१०    १२.०५ भातसा    ८.७७    १४.९४    १२.७० विहार    २५.१०    १३.४१    ३८.९४ तुलसी    ३०.२२    २९.१०    ३५.५६ एकूण    ११.१४    १५.०७    १३.०२

...तर कपातीची गरज नाही 

-  मागील वर्षी २० जूनपर्यंत सर्व धरणांत एकूण १५ हजार १२३ कोटी लिटर एवढा म्हणजे एकूण १० टक्केच साठा शिल्लक होता. -  मात्र, यंदा ७ जूनलाच ११.४२ टक्के असा मागील वर्षांप्रमाणेच साठा असल्याचे दिसून येते. -  २०२१ मध्ये २० जूनपर्यंत १४ टक्के तर २०२० मध्ये ११ टक्के साठा होता. त्यामुळे जुलै महिन्याच्या सुरुवातीला पावसाचे प्रमाण वाढल्यास कपातीची गरज राहणार नाही, असे सांगितले जात आहे.

 

टॅग्स :धरण