संरक्षकभिंतीला चिकटूनच झोपड्यांचे बांधकाम : भिंतीच्या उंचीइतका चिखलाचा थर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पाण्याचा निचरा न झाल्यामुळे चेंबूर येथील भारतनगर भागात दुर्घटना झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
चेंबूर येथील भारतनगर परिसरात ६५०० झोपड्या आहेत. डोंगरात या झोपड्या बांधण्यात आल्या आहेत. डोंगरापलीकडचा भाग हा बीएआरसीच्या हद्दीत येतो. पलीकडचा भाग हा उंच आहे तर भारतनगरचा भाग डोंगराच्या पायथ्याला आहे. त्यामुळे पावसाचे पाणी भारतनगर येथील परिसरात येते. पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी बीएआरसीने संरक्षण भिंतीला लहान नालेही तयार केले आहेत. परंतु झोपड्या अगदी भिंतीला चिकटून बांधण्यात आल्याने पाण्याचा निचरा व्हायला जागाच नाही. त्यामुळे पावसाचे पाणी या घरांच्या भिंतीमध्ये मुरते. रविवारी झालेल्या मुसळधार पावसात मोठ्या प्रमाणात डोंगरावरून माती वाहून आली त्यामुळे पाण्याचा निचरा होणारी नाली बंद झाली, त्यावर मातीचा थर साचला गेला. पाण्याचा जोरामुळे भिंत घरावर पडून दुर्घटना घडली. घराच्या ठिकाणी दरड कोसळू नये म्हणून संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे परंतु त्या भिंतीच्या उंचीइतका चिखल साचला होता. जोरदार पावसामुळे ती संरक्षक भिंत दुमजली घरावर पडली, ते घर इतर घरांवर पडल्याने अनेकांचे जीव गेले.