Join us

दामिनी अ‍ॅप देते आहे विजांचे अलर्ट;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर मुसळधार पावसाचा मारा सुरू आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर मुसळधार पावसाचा मारा सुरू आहे. या दरम्यान, मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होत नसला तरी पावसाने धिंगाणा घातला आहे; परंतु मोठ्या पावसादरम्यान मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असते. अशावेळी मनुष्य आणि वित्तहानी होऊ नये आणि नागरिकांना कडाडणाऱ्या विजांचा अलर्ट मिळावा म्हणून दामिनी अ‍ॅप कार्यान्वित असून, विजा कडाडताना झाडाजवळ उभे राहू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून हवामानासंबंधी विविध उपकरणांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम सातत्याने केले जाते. रडार किंवा इतर घटकांसोबत दामिनीसारखी यंत्रणादेखील हवामान खात्याने नागरिकांना उपलब्ध करून दिली आहे. याद्वारे वीज कोसळणे, त्याचे अलर्ट इत्यादी माहिती नागरिकांना उपलब्ध होत असून, ग्रामीण भागासह शहरी भागांमध्येदेखील याचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. विशेषतः वीज कोसळून वीज यंत्रणेला मोठी हानी पोहोचत असते. अशावेळी ट्रांसफार्मर उडणे, मनुष्यहानी होणे अशा दुर्दैवी घटना घडत असतात. अशा घटना टाळण्यासाठी हवामान खाते आपली उपकरणे अद्ययावत करत असून, आपत्ती काळात नागरिकांनी आपल्या जीवाचे रक्षण करण्यासाठी स्वतःहून खबरदारी बाळगावी, असे आवाहन मुंबई महापालिकेच्या आपत्ती नियंत्रण कक्षाकडूनदेखील सातत्याने केले जाते.

वादळ, वीज आणि मनुष्यहानी

बिहार - २८०

उत्तर प्रदेश -२२०

झारखंड -१२२

मध्य प्रदेश - ७२

महाराष्ट्र - २३

आंध्रप्रदेश - २०

१. सर्वच विजा जमिनीवर पडत नाहीत. ९५ टक्के विजा आकाशातच असतात, फक्त ५ टक्के विजा जमिनीपर्यंत पोहोचतात.

२. विजा एकाच ढगामध्ये, दोन ढगामध्ये किंवा ढग आणि जमिनीमध्ये पडतात. जमीन आणि ढगामधील वीज सर्वात धोकादायक असते.

३. पृथ्वीवर दर सेकंदाला ४० विजा चमकतात. विजेमुळे निर्माण होणारे तापमान हे सूर्याच्या तापमानापेक्षा जास्त असते.

---------------------------

देशभरात वीज पडून २०२० साली ८१५ नागरिकांचे जीव गेले असून, महाराष्ट्रात २३ नागरिकांचे जीव गेले आहेत.

---------------------------

आकाशात विजा चमकत असताना घ्यावयाची खबरदारी

- पायाव्यतिरिक्त शरीराचा कुठलाही भाग जमिनीला स्पर्श होणार नाही, याची काळजी घ्यावी.

- पोहणारे, मच्छिमारी करणारे यांनी त्वरित पाण्यातून बाहेर यावे.

- झाडापासून झाडाच्या उंचीपेक्षा दुप्पट अंतरावर उभे रहावे.

- शक्य असल्यास आपल्या घरावर वीज वाहक यंत्रणा बसवावी.

- वृक्ष, दलदलीचे ठिकाण तथा पाण्याचे स्रोत यापासून शक्यतो दूर रहा.

- चारचाकी वाहनातून प्रवास करीत असल्यास वाहनातच रहावे.

---------------------------

- खुल्या मैदानात उभे राहू नका. विजा सर्वात जास्त खुल्या मैदानात पडतात.

- झाडाखाली उभे राहू नका. उंच ठिकाणी, झाडावर चढू नका.

- विजेचा खांब, टेलिफोनचा खांब, टॉवर इत्यादीजवळ उभे राहू नका.

- धातूची दांडी असलेल्या छत्रीचा वापर करू नका.

- पाण्याचा नळ, फ्रीज, टेलिफोन यांना स्पर्श करू नका, शिवाय त्यापासून दूर रहा.

- प्लग जोडलेली विद्युत उपकरणे हाताळू नका. दूरध्वनीचा वापर करू नका. मोबाइलचा वापर टाळा.