धिक्कार असो !  रेल्वेतून गुरांसारखा प्रवास करायचा आणि एखाद्या भटक्या जनावराप्रमाणे मृत्यूमुखी पडायचं

By शिवराज यादव | Published: September 29, 2017 01:30 PM2017-09-29T13:30:03+5:302017-09-29T13:37:07+5:30

झोपेचं सोंग घेऊन झोपलेल्या रेल्वेने आपण जागं व्हायचंच नाही असं ठरवल्याने अनेक प्रवाशांचा बळी जात आहे. अशा या रेल्वे प्रशासनाचा धिक्कार आहे. 

Damn it! Travel like a cow in the train and die like a wild animal | धिक्कार असो !  रेल्वेतून गुरांसारखा प्रवास करायचा आणि एखाद्या भटक्या जनावराप्रमाणे मृत्यूमुखी पडायचं

धिक्कार असो !  रेल्वेतून गुरांसारखा प्रवास करायचा आणि एखाद्या भटक्या जनावराप्रमाणे मृत्यूमुखी पडायचं

googlenewsNext

मुंबई - मुंबईकरांची लाइफलाइन म्हणून ओळखली जाणारी रेल्वे अत्याधुनिक केली जाईल...लवकरच एसी रेल्वे रुळावर आणली जाईल अशा घोषणा करत नेहमीच रेल्वे प्रवाशांना गाजरं दाखवली जातात. मात्र खरी परिस्थिती काय आहे हे पुन्हा एकदा एलफिन्स्टन - परळ रेल्वे ब्रिजवर झालेल्या चेंगराचेंगरीमुळे समोर आलं आहे. सुखसुविधा तर बाजूला राहिल्या मात्र साध्या सुविधाही रेल्वे प्रवाशांना मिळत नाही आणि हेच खरं आहे. परळला जाणारा ब्रिज अरुंद असल्याने तो वाढवण्यात यावा किंवा पर्यायी मार्ग सुरु करावा ही साधी मागणीदेखील रेल्वे पुर्ण करु शकलेली नाही. रेल्वेच्या या गलथान कारभारामुळे प्रवाशांना विनाकारण आपला जीव गमवावा लागत आहे. रेल्वे प्रवाशांच्या मृत्यूला दुसरं तिसरं कोणी नाही तर रेल्वे प्रशासनच जबाबदार आहे. झोपेचं सोंग घेऊन झोपलेल्या रेल्वेने आपण जागं व्हायचंच नाही असं ठरवल्याने अनेक प्रवाशांचा बळी जात आहे. अशा या रेल्वे प्रशासनाचा धिक्कार आहे. 

मुंबईत दररोज जवळपास 70 लाख प्रवासी रेल्वेने प्रवास करत असतात. मुंबईत प्रवास करायचा म्हटलं की अनेकजण रेल्वेचा पर्यायच निवडतात. रेल्वेत गुरांप्रमाणे प्रवास करायला लागत असतानाही दुसरा कोणताच पर्याय हाती नसल्याने प्रवासीदेखील हतबल असतात. रेल्वे प्रवासी आणि संघटनांनी अनेकदा रेल्वे वाढवण्याची मागणी करुनदेखील त्यांच्याकडे सपशेल दुर्लक्ष केलं जातं. रेल्वे प्रवास आपल्या जिवावर बेतू शकतो हे माहिती असतानाही लोक जीव मुठीत घेऊन प्रवास करत असतात. प्रवाशांची संख्या वाढत असताना लोकलची संख्या मात्र तितकीच आहे. एखादी दुर्घटना घडल्यानंतर तेवढ्यापुरता निषेध व्यक्त करुन पुन्हा गाजरं दाखवणारी रेल्वे आतातरी जागी होणार का ? हा महत्वाचा प्रश्न आहे. 

मुंबईत बस आणि रेल्वे ही मुंबईकरांची लाइफलाइन आहे असं म्हटंल जातं. पण रेल्वे लाइफलाइन नसून डेथलाइन ठरत आहे यात काहीच दुमत नाही. आज जे एल्फिन्स्टन - परळला झालं आहे ते कदाचित उद्या दुस-या रेल्वे स्थानकावर होईल. तेव्हादेखील लोक संताप व्यक्त करतील, रेल्वे निषेध करेल आणि दुस-या दिवशी परिस्थिती जैसे थे असेल. फक्त एल्फिन्स्टन आणि परळच नाही तर मध्य रेल्वेवरील अनेक रेल्वे स्थानकांवर अशी जीवघेणी परिस्थिती आहे. 

मध्य रेल्वेवर ठाणे, डोंबिवली, आसनगाव, बदलापूर, शहाड सारख्या स्थानकात देखील संध्याकाळी अशीच चेंगराचेंगरीची स्थिती असते. त्यामुळे उद्या याच घटनेची पुनरावृत्ती दुस-या स्थानकांवर होऊ शकते ही शक्यता नाकारता येत नाही. डोंबिवली स्थानक प्रशासनाला प्रवासी संघटनांनी, प्रवाशांनी यासंबंधी निवेदनं दिलेली आहेत. पण अद्यापही प्रवासी आपली मागणी पुर्ण कधी होणार याच प्रतिक्षेत आहेत. 

ठाण्यात मुबंई आणि कल्याण दिशेकडील ब्रीज, आसनगावमधील कसा-याच्या दिशेने असणार एकमेव ब्रिज, बदलापूर जुना ब्रिज या ठिकाणीदेखील अशीच परिस्थिती आहे. ठाणे, डोंबिवली, कल्याण स्थानकात मोठे ब्रिज बांधले आहेत पण तरीही जून्या छोट्या ब्रिजवर गर्दी होतेच. सोयीचे पडत असल्याने अनेक प्रवासी या ब्रिजने प्रवास करत असतात. मुळात एखादा ब्रिज बांधताना किंवा एखादी सुविधा देण्याआधी प्रवाशांचा विचार कितपत केला जातो हा एक मोठा प्रश्न आहे. 

जीवघेणी रेल्वे स्थानकं 
मुंबईतील जीवघेण्या रेल्वे स्थानकांबद्दल बोलायचं झालं तर डोंबिवली रेल्वे स्थानक पहिल्या क्रमांकावर असून 2 लाख 33 हजार 535 प्रवासी रोज प्रवास करतात. यानंतर ठाणे आणि कल्याण रेल्वे स्थानकाचा क्रमांक आहे. ठाण्यात रोज 2 लाख 25 हजार 490 तर कल्याणमध्ये 1 लाख 80 हजार 676 प्रवासी जीव मुठीत घेऊन रेल्वेने प्रवास करतात. 

पाच वर्षांत देशभरात ५८६ रेल्वे अपघात 
गेल्या वर्षभरात देशाच्या विविध भागांत रेल्वेचे छोटे-मोठे ६० अपघात झाल्यानं लाखो प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रेल्वे अपघातांची जबाबदारी घेत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना राजीनामा दिला असला, तरी यामुळे अपघात काही थांबलेले नाहीत. गेल्या पाच वर्षांत देशभरात ५८६ रेल्वे अपघात झाले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक ५३ टक्के अपघात हे रूळांवरून रेल्वे घसरून झाले आहेत. 

रेल्वे कर्मचा-यांना आपली कामं सोडून घरची काम करायला लावणे 
अपघातांसाठी असलेलं अजून एक मुख्य कारण म्हणजे रेल्वे कर्मचा-यांना त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी पार पाडू न देता घरची कामं करायला लावणे. मुंबईतच पश्चिम आणि मध्य रेल्वेवर सुमारे १० हजार कर्मचारी या कामासाठी नेमलेले आहेत. ते गँगमन म्हणून ओळखले जातात. त्यांनी सातत्याने रुळांची पाहणी करणं अपेक्षित आहे. पण, एवढं जबाबदारीचं काम सोडून हा कर्मचारीवर्ग बड्या अधिकाऱ्यांच्या घरी पडेल ती कामं करत असल्याचं निदर्शनास आलं होतं. 
 

Web Title: Damn it! Travel like a cow in the train and die like a wild animal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.