Join us

दामोदर हॉल उद्यापासून बंद; २०२६मध्ये नव्या रूपात होणार सुरू

By संजय घावरे | Published: October 31, 2023 8:11 PM

नवीन हॉलमध्ये जुन्या कर्मचाऱ्यांना देणार प्राधान्य

मुंबई - सर्वासामान्यांचे मध्य मुंबईतील मनोरंजनाचे हक्काचे केंद्र असलेले तसेच कामगार वर्गातील बऱ्याच कलाकारांना संधी देणारा परळमधील दामोदर हॉल उद्यापासून (१ नोव्हेंबर) बंद होणार आहे. २०२६मध्ये दामोदर हॅाल नव्या रूपात रसिकांच्या सेवेत रुजू होईल. हॉलमधील कर्मचाऱ्यांचा निरोप समारंभ पार पडला असून, दोन महिन्यांचा पगाराच्या स्वरूपात त्यांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे.

सोशल सर्व्हिस लीग संस्थेच्या शाळेत सध्या जवळपास ४५०० हजार विद्यार्थी शिकत आहेत. संस्थेने शाळा, चाळ आणि दामोदर हॅालच्या पुर्नविकासाचे काम हाती घेतले आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी सर्वप्रथम हॉल आणि चाळ तोडण्यात येणार आहे. सध्या संस्थेचे कार्यालय असलेल्या ठिकाणी दामोदर हॉलची नवीन इमारत उभारण्यात येईल. हा संपूर्ण प्रकल्प दोन-अडीच वर्षांमध्ये पूर्ण होईल आणि २०२६मध्ये दामोदर हॉलची नवीन इमारत रसिकांसाठी खुली होणार असल्याचे संकेत संस्थेचे अध्यक्ष आनंद माईणकर यांनी 'लोकमत'शी बोलताना दिले आहेत.

माईणकर म्हणाले की, दामोदर हॉलच्या नवीन इमारतीवर अंदाजे २५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. जुना हॉल ७५० आसनक्षमतेचा आहे. भविष्यात इतक्याच आसनक्षमतेच्या हॉलसोबत ४०० आणि ६०० आसनक्षमतेचे हॉलही बांधण्यात येतील. दामोदर हॉल आणि त्यावर चार मजले अशी नवीन इमारत असेल. अंदाजे २०० गाड्या पार्क करण्याची सुविधा असेल. पावसाळ्यापूर्वी आयओडी आली की कामाला गती मिळेल. दामोदर हॉलच्या कर्मचाऱ्यांना छोटेखानी समारंभात निरोप देण्यात आला आहे. नवीन इमारत उभी राहिल्यावर जुन्या कर्मचाऱ्यांना प्रथम प्राधान्य दिले जाईल असेही त्यांना सांगितले आहे. कोणाचेही नुकसान करण्याचा संस्थेचा हेतू नसल्याचेही ते म्हणाले.

दामोदर हॉलचे व्यवस्थापक सुंदर परब म्हणाले की, कर्मचाऱ्यांचा निरोप समारंभ झाला, पण भविष्याबाबत काहीच सांगितले नाही. आम्हा तीन व्यवस्थापकांची केवळ एक घड्याळ, पुष्पगुच्छ आणि नुकसान भरपाई म्हणून दोन पगार देऊन बोळवण करण्यात आली. आता आम्ही बेरोजगार झाल्याने करायचे काय? हा प्रश्न आहे. नाट्य परिषदेपासून विभागातील रसिक मायबाप यांचा पाठिंबा आहे, पण त्यामुळे आमची चूल पेटणार नाही. काम निघाले तर बोलवू असे आश्वासन संस्थेने दिले आहे, पण खात्रीशीर काही नाही. तुटपुंजी रक्कम देऊन घरी पाठवले. संस्थेच्या इतर सेवांमध्ये आम्हाला सामील केले जाण्याची अपेक्षा होती, पण तसे काही झाले नाही.

टॅग्स :मुंबई