१००० आसन क्षमतेचाच होणार दामोदर हॉल; २ वर्षात बांधकाम पूर्ण करण्याचे आदेश 

By संजय घावरे | Published: February 8, 2024 07:27 PM2024-02-08T19:27:46+5:302024-02-08T19:27:58+5:30

दीपक केसरकरांसह प्रवीण दरेकरांनी केली नाट्यगृहाच्या बांधकामाची पाहणी, कर्मचाऱ्यांसह नागरिकांशीही साधला संवाद

Damodar Hall will have a capacity of 1000 seats; Order to complete the construction within 2 years | १००० आसन क्षमतेचाच होणार दामोदर हॉल; २ वर्षात बांधकाम पूर्ण करण्याचे आदेश 

१००० आसन क्षमतेचाच होणार दामोदर हॉल; २ वर्षात बांधकाम पूर्ण करण्याचे आदेश 

मुंबई - दामोदर नाट्यगृह व सोशल सर्व्हिस लीगच्या शाळेचे बांधकाम एकाच वेळी सुरू करून दोन वर्षांत पूर्ण करण्याचे आदेश मुंबई महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्यानंतर शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री, तसेच मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आमदार प्रवीण दरेकर यांच्यासह दामोदर हॉलच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. नाट्यगृह १००० आसनक्षमतेचे करण्याची सूचनाही त्यांनी सोशल सर्व्हिस लीगला दिली.

मागील बऱ्याच दिवसांपासून ऐरणीवर असलेल्या दामोदर हॉलचा प्रश्न निकाली काढण्याच्या उद्देशाने केसरकर यांनी प्रत्यक्ष जाऊन कामाची पाहणी केली आणि तिथल्या नागरिकांशीही संवाद साधला. यावेळी केसरकर म्हणाले की, दामोदर हॉल हे मराठी संस्कृतीचे प्रतीक आहे. परिसरातील नागरिकांचे, विविध ग्रामस्थांचे कार्यक्रम इथे व्हायचे. सोशल सर्व्हिस लीगची शाळा आणि दामोदर हॉलही व्यवस्थित सुरू राहावे यासाठी नुकत्याच झालेल्या मनपाच्या मिटिंगमध्ये काही निर्णय घेण्यात आले. त्यात ५०० ऐवजी १००० आसनक्षमतेचे नाट्यगृह दामोदर हॉलच्या जागेवर उभे राहिल. शाळा आणि नाट्यगृहाचे काम एकाच वेळी सुरू होईल. अगोदर शाळा आणि नंतर नाट्यगृह बांधून जमणार नाही. बच्चूभाई चाळ आणि इतर नागरिकांच्या इमारतीचे कामही सुरू राहील. या कामात सहकार्य करण्यासाठी इथल्या नागरिकांशी चर्चा करणार असल्याचेही केसरकर म्हणाले.

विकास होत असताना कोणीही विस्थापित होता कामा नये तसेच महाराष्ट्राला लाभलेली नाट्यपरंपराही खंडीत होता कामा नये. असे केल्यास हा प्रश्न सामोपचाराने सुटेल असा विश्वासही केसरकरांनी व्यक्त केला. दोन वर्षांमध्ये शाळा आणि नाट्यगृहाचे काम पूर्ण करण्यात येणार असून, टप्प्याटप्प्याने काम करण्याच्या सूचना दिल्याचेही त्यांनी सांगितले. 

याबाबत सोशल सर्व्हिस लीगचे अध्यक्ष आनंद माईणकर 'लोकमत'शी बोलताना म्हणाले की, केसरकर आणि दरेकरांना जागेचे नकाशे दाखवले. त्यानंतर त्यांनी ५००ऐवजी १००० आसनक्षमतेचे नाट्यगृह करण्याची सूचना दिली. त्यासाठी लागणारी स्पेशल मंजूरी सोबत असलेल्या महानगर पालिकेच्या अधिकऱ्यांना द्यायला सांगितली. प्रेक्षकांची संख्या वाढल्यावर वाढवाव्या लागणाऱ्या पार्किंगसाठी परवानगी देण्याचे मनपा अधिकाऱ्यांनी मंजूर करू असे सांगितले. शाळेच्या आठ मजल्यांच्या नवीन इमारतीची आयओडी मंजूर झाली असून, त्यावर स्वाक्षरीही झाल्याने त्यात बदल करता येणार नाही. नाट्यगृहाच्या तोडकामावरील स्टे लवकर उठवण्यात येणार असल्याचेही माईणकर म्हणाले.

- दोन नवीन इमारतींत शाळा असेल. यात शाळेच्या वर्गांसोबतच, संगणक लॅब, वाचनालय, सीबीएससी शाळा, रात्र शाळा, प्रयोगशाळा, मुख्याध्यापक कार्यालय, शिक्षकांची रूम इत्यादी बरेच काही असेल. 
- दामोदर हॉलची इमारत वेगळी असेल. यात हॉलचे कार्यालय, सहकारी मनोरंजन मंडळासाठी जागा, संस्थेचे कार्यालयही असेल. दोन मजल्यांवर १०० गाड्या पार्किंगची मिळालेली मंजूरी वाढवावी लागेल. 
- १००० आसनक्षमता करण्यात येणार असल्याचा परिणाम बांधकामाच्या एकूण बजेटवर होईलच, पण प्लॅनमध्येही बदल करावा लागेल. यात मजले वाढवता येणार नाहीत. आठ मजल्यांमध्येच सर्व करावे लागेल.

Web Title: Damodar Hall will have a capacity of 1000 seats; Order to complete the construction within 2 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.