Join us  

दामूनगर पुन्हा पेटले; पोलिसांना घेराव

By admin | Published: February 03, 2017 3:53 AM

दामूनगरमध्ये आग लागण्याची ही चौथी घटना आहे. हे असेच चालू राहिले तर एक दिवस असा येईल की घरी एकट्या असणाऱ्या लेकरा-बाळांचा मृत्यू पाहण्याची वेळ आमच्यावर येईल

- गौरी टेंबकर,  मुंबईदामूनगरमध्ये आग लागण्याची ही चौथी घटना आहे. हे असेच चालू राहिले तर एक दिवस असा येईल की घरी एकट्या असणाऱ्या लेकरा-बाळांचा मृत्यू पाहण्याची वेळ आमच्यावर येईल, अशी व्यथा दामूनगरवासीयांनी मांडली. गुरुवारी येथे पुन्हा लागलेल्या आगीमुळे स्थानिकांनी शेकडोंच्या संख्येने समतानगर पोलिसांना घेराव घालत रोष व्यक्त केला.दामूनगरमध्ये गेल्या वर्षी लागलेल्या आगीत दोघांना प्राण गमवावे लागले. मात्र मत मागण्यासाठी दारोदारी फिरणाऱ्या राजकारण्यांना त्याचे काहीच सोयरसुतक नाही, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. गुरुवारी दुपारी १२च्या सुमारास ही आग लागली. मात्र मोठमोठे वायदे करणारा एकही नेता आमच्या इथे फिरकला नाही. आमचे हातावर पोट आहे, सकाळी उठून आम्ही कामावर निघून जातो. मागे लेकरंबाळं गाढ झोपेत असतात. आम्ही घरी नसताना अशीच आग लागली तर घरी गेल्यावर लेकरांचा मृत्यू पाहण्याची वेळ आमच्यावर येईल अशी भीती आम्हाला वाटते, असे स्थानिक अंजना ढगे यांनी सांगितले.आमचे पुनर्वसन करा, आम्हाला घर द्या, अन्यथा आकड्याच्या विजेने आमचा बळी जाईल, नेते मते घेऊन मोकळे होतील, त्यामुळे मतदान करायचेच नाही, असे आम्ही ठरविले आहे. वचनपूर्ती करा नाहीतर आमच्याकडून मत मिळण्याची अपेक्षा सोडा, असा आक्रमक पवित्रा दामूनगरवासीयांनी घेतला. जवळपास अडीचशे ते तीनशे लोकांनी दुपारी समतानगर पोलिसांना घेराव घातला. दरम्यान, आम्ही याबाबतचा अहवाल संबंधितांना दिला आहे. आग लागण्याचे नेमके कारण काय? याची आम्ही चौकशी करीत आहोत, असे समतानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप यादव यांनी स्थानिकांना सांगितले आहे. (प्रतिनिधी)