डम्पिंग ग्राउंडच्या आगीतून पावसाळ्यानंतरच सुटका!
By admin | Published: April 1, 2016 02:50 AM2016-04-01T02:50:39+5:302016-04-01T02:50:39+5:30
देवनार डम्पिंग ग्राउंडच्या आगीची थेट केंद्रानेच गंभीर दखल घेतल्यामुळे मुंबई महापालिकेचे धाबे दणाणले असून, कचऱ्यापासून वीजनिर्मिती व शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट
मुंबई : देवनार डम्पिंग ग्राउंडच्या आगीची थेट केंद्रानेच गंभीर दखल घेतल्यामुळे मुंबई महापालिकेचे धाबे दणाणले असून, कचऱ्यापासून वीजनिर्मिती व शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या प्रक्रिया वेगाने सुरू होणार आहेत़ आॅक्टोबरपर्यंत देवनारकरांची सुटका होईल, अशी हमी आयुक्त अजय मेहता यांनी केंद्राला दिली आहे़
देवनार डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याच्या १२३ फूट डोंगराला आग लागण्याची घटना वारंवार घडत आहे़ याविरोधात आवाज उठविणाऱ्या देवनारवासीयांकडे आतापर्यंत दुर्लक्ष करणाऱ्या महापालिकेची थेट केंद्रानेच हजेरी घेतली आहे़ दीड तास चाललेल्या या बैठकीत पालिका आयुक्तांनी केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे कचरा पुनर्प्रक्रिया प्रकल्पाचे सादरीकरण केले़ यात सर्वप्रथम आगीच्या घटना टाळण्यासाठी डम्पिंग ग्राउंडवर तत्काळ खबरदारीच्या उपाययोजना व त्यानंतर शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावणे याचा समावेश आहे़
शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावण्यास पावसाळ्यापूर्वी निविदा मागविण्यात येणार आहेत. जेणेकरून पावसाळा संपताच कचऱ्याचा निपटारा करण्याचा प्रकल्प वेगाने सुरू होऊ शकेल, अशी माहिती आयुक्तांनी दिली़ देवनारमधील कचऱ्याच्या डोंगराखाली साचलेला मिथेन वायू जमा करण्यास आयआयटी मुंबई या संस्थेने कृती आराखडा तयार केला आहे़ लवकरच या कामाला सुरुवात होईल, असे त्यांनी स्पष्ट केले़
देवनार डम्पिंगवरील उपाययोजना
- संरक्षक भिंतीची दुरुस्ती सुरू
- सुरक्षारक्षक १०२ वरून दीडशे करण्यात आले
- १२ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले
- ४० नाइट व्हिजन कॅमेरे बसविणार
- आयआयटी व निरी यांनी स्लोप स्टॅबिलायझेशन व मातीचे आच्छादन करण्यास सुचविले होते़ त्यानुसार आग लागलेल्या ठिकाणी माती टाकण्यात आली आहे़ सध्या सहा हेक्टर भागात आच्छादन टाकून झालेले आहे़
- डम्पिंग ग्राउंड परिसरात दोन ते तीन ठिकाणी बोअरवेल खणण्यात येणार आहेत़
कचऱ्यापासून वीजनिर्मिती
दीर्घकालीन उपाययोजना म्हणून कचऱ्यापासून वीजनिर्मितीच्या प्रस्तावासाठी टाटा कन्सलटन्सी इंजिनीअर्स यांची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे़ यापुढे डम्पिंग ग्र्राउंडवर शास्त्रोक्त पद्धतीनेच कचरा टाकण्यात येणार आहे़
अंतर्गत रस्ते तयार करणार
अग्निशमन दलाच्या बंबासाठी अंतर्गत रस्ते तयार करण्यात येणार आहेत़ या कामाच्या निविदा मागविण्यात येणार आहेत़ तसेच अग्निशमन दलाच्या दहा गाड्या कायमस्वरूपी तैनात ठेवण्यात येणार आहेत़
सेना-भाजपात कचऱ्याचा वाद
पर्यावरण मंत्रालयाने दोन सदस्यांना पाठवून देवनार आगीच्या चौकशीचा अहवाल मागविला होता़ हा अहवाल बुधवारी सादर करण्यात आला आहे़
तीन महिन्यांमध्ये देवनारचा प्रश्न सोडवा नाही तर आंदोलन करण्याचा इशारा सत्ताधारी शिवसेनेने दिला आहे़ मात्र हे काम महापालिकेचे असल्याचे प्रत्युत्तर देत भाजपानेही शिवसेनेची गोची केली आहे.