डम्पिंगवरील आगीच्या धुराने नागरिक हैराण!
By admin | Published: March 2, 2015 03:31 AM2015-03-02T03:31:42+5:302015-03-02T03:31:42+5:30
देवनार डम्पिंग ग्राउंडवर सातत्याने लागणाऱ्या आगीच्या धुराने लगतचे रहिवासी त्रस्त झाले आहेत. महत्त्वाचे म्हणजे गुरुवारी येथे लागलेल्या
मुंबई : देवनार डम्पिंग ग्राउंडवर सातत्याने लागणाऱ्या आगीच्या धुराने लगतचे रहिवासी त्रस्त झाले आहेत. महत्त्वाचे म्हणजे गुरुवारी येथे लागलेल्या आगीच्या धुराने लगतच्या परिसरावर कब्जा केल्याने रहिवाशांना अतोनात त्रास झाला होता. सुदैवाने ही आग आता विझली असली तरीदेखील सुरक्षेची खबरदारी म्हणून येथे २ फायर इंजिन आणि १ वॉटर टँकर तैनात करण्यात आला आहे.
गुरुवारी दुपारी देवनार डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याला लागलेली आग उत्तरोत्तर पसरतच गेली. या आगीच्या उठलेल्या धुराने लगतचा परिसर काबीज केला. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी हजरही झाले. परंतु आगीच्या ज्वाळा पसरतच होत्या. शिवाय दुपारचे कडाक्याचे ऊन आणि एखाद्या वणव्यासारखी लागलेली आग विझविताना अग्निशमन दलाला शर्थीचे प्रयत्न करावे लागत होते. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी घटनास्थळी सहा वॉटर टँकर्स आणि तीन फायर इंजिन दाखल झाले होते. परंतु पसरत असलेल्या आगीवर नियंत्रण मिळविणे कठीण जात होते. शुकवार आणि शनिवारी करण्यात आलेल्या अथक प्रयत्नांनंतर या आगीवर अग्निशमन दलाच्या जवानांनी नियंत्रण मिळविले.
परंतु आगीमुळे शुक्रवारी घाटकोपर, चेंबूर आणि वडाळा परिसरातील स्थानिकांना याचा त्रास झाला. जळलेल्या कचऱ्याच्या दुर्गंधीचा त्रास जाणवू लागला. शिवाय ही दुर्गंधी नवी मुंबईपर्यंत प्रवास करणाऱ्यांनादेखील जाणवत होती, असे येथील एका स्वयंसेवी संघटनेच्या कार्यकर्त्याने सांगितले. शनिवारनंतर आग आटोक्यात आली असली तरी देवनार येथील डम्पिंग ग्राउंडवर नेहमीच छोट्या-छोट्या आग लागण्याच्या घटना घडत असतात. त्याच्या ज्वाळा आणि धूर लगतच्या परिसरातील रहिवाशांना त्रासदायक ठरत आहे. (प्रतिनिधी)