Join us

मुंबईकरांसाठी खुशखबर; मध्य वैतरणाही भरण्याच्या स्थितीत, नागरिकांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 12:36 PM

उपलब्ध पाणीसाठा ही जपून वापरण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ धरणांत सध्या ८३ टक्के पाणीसाठा असल्याने मुंबईकरांची  पाणीकपात मुंबई पालिकेकडून रद्द करण्यात आली आहे. मात्र त्याचवेळी उपलब्ध पाणीसाठा ही जपून वापरण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे. 

ऑगस्ट व सप्टेंबर २०२३ मध्ये  पाणीसाठ्यासंदर्भात काही प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाल्यास त्याप्रमाणे योग्य तो निर्णय घेण्यात येईल असेही स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मध्य वैतरणा धरणांत ९६ टक्के साठा उपलब्ध असून लवकरच हे धरणही भरण्याच्या स्थितीत असल्याची माहिती पालिकेच्या जलअभियंता विभागाने दिली आहे. यामुळे लवकरच मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या आणखी एक धरण ओसंडून वाहणार असल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मुंबईला वर्षभराची तहान भागवण्यासाठी १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर म्हणजेच १ लाख ४४ हजार ७३६ कोटी लिटर एवढ्या पाण्याची आवश्यकता असते. मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या अपर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा जलाशय, भातसा, विहार आणि तुळशी या सात जलाशयांमध्ये मिळून सध्या पाणीसाठा ८० टक्क्यांहून अधिक झाला असल्याने या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने १० टक्के पाणी कपात रद्द केली आहे. दरम्यान, दोन ते तीन महिन्यांपूर्वी पाणी कपातीमुळे अनेक भागात नागरिकांना टंचाईला सामोरे जावे लागले. पाणी भरण्यावरून नागरिकांमध्ये भांडणे होत होती. काही भागात गढूळ पाणी येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला होता. आता तलाव भरू लागल्याने पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार नाही अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मध्य वैतरणा ९६ टक्क्यांवर

आतापर्यंत पाच महत्त्वाच्या आणि मोठी जलसंधारण क्षमता असलेल्या तलावांपैकी तानसा व मोडकसागर हे दोन तलाव ओसंडून वाहू लागले आहेत. त्याशिवाय संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील तुळशी व विहार हे दोन लहान तलावही वाहू लागले आहेत. मध्य वैतरणा मुंबईला पाणीपुरवठा करणारे महत्त्वाचे धरण असून याची क्षमता १ लाख ९३ हजार ५३० दशलक्ष लिटर आहे. सध्या या धरणात १ लाख ८६ हजार ४७९ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध झाला असून येत्या काही दिवसांत चांगला पाऊस झाल्यास हे धरण ओसंडून वाहणार असल्याची माहिती जलअभियंता विभागाकडून देण्यात आली आहे.

भातसा ७७ टक्क्यांवर

- भातसा तलावातील पाणीसाठा ७७ टक्क्यांवर पोहोचला आहे. हा तलाव पूर्ण भरणे मुंबईकरांसाठी महत्त्वाचे आहे. - तलावाची पूर्ण भरून वाहण्याची क्षमता सात लाख १७ हजार दशलक्ष लिटर इतकी आहे. - सध्या यात ५ लाख ५२ हजार ९२१ दशलक्ष लिटर साठा आहे. या तलावातून मुंबईला दररोज एक हजार ८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो.

 

टॅग्स :धरणपाणी