Join us

व्होट बँकसाठी दामूनगरचे राजकारण

By admin | Published: January 08, 2016 2:22 AM

कांदिवली पूर्वेकडील दामूनगरला लागलेल्या आगीतील दुर्घटनाग्रस्तांचे चांदिवलीमध्ये पुनर्वसन केले जाईल, असे आश्वासन सरकारकडून देण्यात आले होते.

गौरी टेंबकर-कलगुटकर,  मुंबईकांदिवली पूर्वेकडील दामूनगरला लागलेल्या आगीतील दुर्घटनाग्रस्तांचे चांदिवलीमध्ये पुनर्वसन केले जाईल, असे आश्वासन सरकारकडून देण्यात आले होते. परंतु आता दुर्घटग्रस्तांचे पुनर्वसन चांदिवलीमध्ये केले तर येथील व्होट बँक आपल्या हातातून निघून जाईल, अशी भीती सरकारला लागून राहिली आहे. परिणामी दुर्घटनाग्रस्तांना तारीख पे तारीख मिळत असून, दुर्घटनाग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या राजकारणाने येथे जोर पकडल्याने स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे.दामूनगरच्या आगीतील दुर्घटनाग्रस्त कुटुंबीयांचे चांदिवलीमधील तयार साडेआठशे घरांत पुनर्वसन केले जाईल, असे आश्वासन खासदार गोपाळ शेट्टी यांनी दिले होते. या आश्वासनाला महिना लोटला तरी पुनर्वसनाबाबत काहीच हालचाल झालेली नाही. २८ डिसेंबरपर्यंत संबंधितांना घरे देण्यात येणार होती. नंतर मात्र ही तारीख ५ जानेवारी देण्यात आली. आता मात्र पुनर्वसनाचे काम मार्च महिन्यात होईल, असे दुर्घटनाग्रस्तांना सांगण्यात येत आहे. मुळात दामूनगरची लोकवस्ती मोठी आहे. आणि या दामूनगरमधील लोकवस्ती जर चांदिवलीला स्थलांतरित झाली तर त्याचा फटका येथील राजकारण्यांना बसेल म्हणून पुनर्वसनाची टाळाटाळ केली जात आहे, असा आरोप आता रहिवाशांनी केला आहे. पुनर्वसन लवकर करण्यात यावे म्हणून येथील काही रहिवाशांनी वनविभागाची भेटही घेतली. भेटीदरम्यान ५ जानेवारी रोजी या कामाला प्राधान्य देण्यात येईल, असे त्यांना सांगण्यात आले. परंतु अद्याप काहीच हालचाल झालेली नाही, अशी माहिती स्थानिकांनी दिली.दोन दिवसांत मदत मिळणारमुंबई : दामूनगरमधील दुर्घटनाग्रस्तांना दोन दिवसांत पंचवीस हजार रुपयांची मदत मिळणार आहे. या घटनेला महिना लोटला तरी स्थानिक मदतीपासून वंचित असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल यंत्रणेने घेतली असून, स्थानिकांना ही मदत दोन दिवसांत दिली जाईल, असे उपनगर जिल्हाधिकारी शेखर चन्ने यांनी आमदार प्रकाश सुर्वे यांना कळविले आहे.हिवाळी अधिवेशनात आमदार सुर्वे यांनी यासंबंधी आवाज उठविला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंचवीस हजार रुपयांची मदत जाहीर केली होती. मात्र महिना उलटला तरी अद्याप दुर्घटनाग्रस्तांना मदत मिळाली नव्हती. ‘लोकमत’नेही हा प्रश्न सातत्याने लावून धरल्यानंतर यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. आगीत रहिवाशांची कागदपत्रे जळून खाक झाल्याने त्यांना कागदपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी शिबिराचे आयोजन केले जाणार आहे. वनजमिनीवरील पुनर्वसनासाठी भरलेल्या सात हजार रुपयांची पावती रहिवाशांना देण्यात येणार आहे. पंधरा दिवसांत जागेचा सर्व्हे करून त्यांचे पुनर्वसन करता येईल का? यासाठी मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेतली जाणार आहे, असेही सुर्वे यांनी सांगितले.आगीचे नेमके कारण सांगणारा अहवाल अद्यापही पोलिसांना प्राप्त झालेला नाही, असे समतानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप यादव यांनी सांगितले. तर दुसरीकडे आगीचा गोपनीय अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.दामूनगरमध्ये वीज नसल्यामुळे चोरीचे प्रमाण वाढले आहे. महत्त्वाचे म्हणजे हे चोर महिलांचा वेश धारण करून चोरी करत असल्याने त्यांना पकडणे शक्य होत नाही. याप्रकरणी पोलीसही तक्रार घेण्यास टाळाटाळ करत आहेत.- रामेश्वर म्हस्के, स्थानिकदुर्घटनाग्रस्तांना मदत करण्यासाठी प्रवीण दरेकर यांनी परिसरात दानपेटी मांडली होती. ज्यात सढळ हस्ताने अनेकांनी रक्कम जमा केली होती. त्यातील पैशांचे काय झाले याची माहिती आम्हाला देण्यात आली नाही.- एड. कुमार निकंबे, स्थानिक