Join us

'दानवे ते कदम', भाजपचे 8 नेते अन् त्यांची आठ बेताल वक्तव्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2018 4:08 PM

भाजप नेत्यांच्या बेताल वक्तव्याची परंपरा कायम ठेवत भाजपा आमदार राम कदम यांनीही बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांच्या पंक्तीत स्थान मिळवले आहे

मुंबई - भाजप नेत्यांच्या बेताल वक्तव्याची परंपरा कायम ठेवत भाजपा आमदार राम कदम यांनीही बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांच्या पंक्तीत स्थान मिळवले आहे. मुलगी पळवून नेण्यासाठी मदत करू, असे म्हणत कदम यांनी संपूर्ण स्त्री जातीचा अपमान केला आहे. मात्र, स्त्रियांबद्दल किंवा अशाचप्रकारे दर्जाहिन वक्तव्य करणारांची यादी मोठी आहे. त्यामध्ये भाजपच्या प्रदेशाध्यक्षांपासून ते पंकजा मुंडेंपर्यत अनेक नेत्यांचा समावेश आहे.  

भाजपाकडून विधानपरिषदेवर गेलेले आमदार प्रशांत परिचारक यांनीही भारतीय सैन्यांबद्दल विक्षिप्त वक्तव्य केले होते. सैनिक सीमेवर वर्षभर राहतात, मग इकडे त्यांना मुलं होतात, असे म्हणत प्रशांत परिचारक यांनी सैनिकांच्या पत्नींच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले होते. विशेष म्हणजे भरसभत जाहीरपणे प्रशांत परिचारक यांनी हे अकलेचे तारे तोडले होते. 

भाजप नेते आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनीही दारू विकण्यासाठी महिलांच्या नावाचा उपयोग करण्याचा सल्ला दिला होता. दारूचे ब्रँड विकत नसतील तर त्याला महिलांचे नाव द्या. त्यामुळे दारुचा खप वाढेल, असे म्हणत संपूर्ण स्त्री वर्गाचा अपमान केला होता. 

पंकजा मुंडे यांनीही विद्यार्थीनीकडे शरीरसुखाची मागणी करणारा निर्दोष; तो माझा भाऊ आहे, असे म्हणत मुलींची छेड काढणाऱ्या एका आरोपीला पाठिशी घालण्याचे काम केले होते.

अहमदनगर जिल्ह्यातील भाजप नेते श्रीपाद छिंदम यांनीही शिवाजी महाराजांबद्दल अशाचप्रकारे बेताल वक्तव्य केले होते. त्यानंतर, छिंदम यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. 

गिरीश बापट यांचीही एका कार्यक्रमात जीभ घसरली होती. ज्या क्लिप्स तुम्ही रात्री बघता, त्या आम्हीही बघतो. त्यामुळे आम्ही म्हातारे ... देठ अजून हिरवं आहे...' असे शब्द राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी वापरले होते. त्यानंतर त्यांच्यावरही मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. 

एकनाथ खडसे यांनीही शेतकऱ्यांच्या भावना दुखावणारे वक्तव्य केले होते. शेतकऱ्यांकडे वीजबील भरायला पैसे नाहीत, पण मोबाईल खेरदी करायला पैसे आहेत, असे खडसेंनी म्हटले होते. 

तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीही शेतकऱ्यांच्या भावना दुखावणारे वक्तव्य केले होते. कर्जमाफीसाठी रस्त्यावर उतरुन आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना 'रडतात साले' असे म्हणत रावसाहेब दानवेंनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा अपमान केला होता. त्यानंतर, 

आता राम कदम यांनी एक पाऊल पुढे टाकत, पोरी पटत नसतील तर पळवून आणा, मी पाठीशी आहे, असे म्हणत या यादीत सर्वोच्च स्थान पटकावले आहे. घाटकोपर येथील दहीहंडी उत्सवात राम कदम यांनी हे वक्तव्य केले होते. 

टॅग्स :भाजपाराम कदमएकनाथ खडसेगिरीष बापट