लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात अनेक बार ऑर्केस्ट्रा बारच्या नावाने डान्सबार सुरू असून कोट्यवधी रुपयांचा काळा पैसा तिथे उडविला जात आहे. अनेक गैरकृत्यांचे आगार ठरणारे हे डान्सबार बंद करावेत, या मागणीसाठी अनेकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना लेखी पत्र दिले. स्मरणपत्र दिले तरीही हे डान्सबार बंद केले जात नाहीत. त्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही, त्याला कारण काय? राज्य सरकारचा गैरकृत्य करणाऱ्या या डान्सबारना आशीर्वाद आहे का? असा संतप्त सवाल मराठा नेते बाळासाहेब मिरजे यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे.
मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरात शेकडो ऑर्केस्ट्रा बार हे डान्सबार म्हणून राजरोस सुरू आहेत. त्यातून वर्षाला किमान १ हजार ४०० कोटींची उलाढाल केली जात आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईमध्ये ऑर्केस्ट्रा बारच्या नावाने चालविले जात असणारे किमान ४०० बार असून त्यात प्रत्येक दिवशी एका बारमध्ये किमान एक लाख रुपये उडविले तर वर्षाला १ हजार ४०० कोटींच्या काळ्या पैशांची उधळपट्टी होत असून त्या पैशाला कोणताही जीएसटी नाही; कोणताही कर लागत नाही. त्यामुळे या १ हजार ४०० कोटींहून अधिक उलाढाल होणाऱ्या काळ्या पैशांच्या उधळपट्टीला वरदहस्त देण्याच्या बदल्यात होत असलेली हफ्तावसुली कुणाला पोहोचविली जात आहे. या कोट्यवधी रुपयांच्या काळ्या पैशांसाठी ऑर्केस्ट्रा बारवर कारवाई होत नाही का? असा सवाल बाळासाहेब मिरजे आणि ॲड. यशपाल ओहोळ यांनी राज्य सरकारला विचारला आहे.