Join us

डान्सबार मालकांनो, सावधान...

By admin | Published: March 19, 2016 1:26 AM

डान्सबारवरील बंदी उठविल्यानंतर अतिउत्साही बारमालकांनी विनापरवाना डान्सबार सुरू केले. मात्र त्यांच्या या उत्साहावर विरजण टाकत मुंबई पोलिसांनी धडक कारवाईचा वेग वाढविलेला दिसत

- मनीषा म्हात्रे, मुंबईडान्सबारवरील बंदी उठविल्यानंतर अतिउत्साही बारमालकांनी विनापरवाना डान्सबार सुरू केले. मात्र त्यांच्या या उत्साहावर विरजण टाकत मुंबई पोलिसांनी धडक कारवाईचा वेग वाढविलेला दिसत आहे. बंदी उठल्यानंतर विनापरवाना सुरू असलेल्या डान्सबारवर दिवसाआड कारवाई होताना दिसत आहे. संस्कृती आणि नैतिकतेच्या मुद्द्यावरून राज्यातील डान्सबारवर बंदी घालण्याचा निर्णय २००५मध्ये तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी घेतला होता. त्याच्या विरोधात डान्सबारमालक आणि तेथे काम करणाऱ्या बारबालांची संघटना न्यायालयात गेली. अखेर १० वर्षांच्या प्रयत्नानंतर सर्वोच्च न्यायालयाने यावरील बंदी उठवली. त्यानंतर तब्बल १३०पेक्षा जास्त अर्ज परवानगीसाठी पोलिसांच्या दफ्तरी आले. मात्र यापैकी अवघ्या ४ बारमालकांना तात्पुरत्या स्वरूपात परवानगी देण्याची घाई पोलिसांनी केली. यामध्ये इंडियाना (ताडदेव), नटराज (विद्याविहार), पद्मा पॅलेस (भांडुप), उमा पॅलेस (मुलुंड) या बारचा समावेश आहे. विशेष म्हणजे या बारवर वारंवार कारवाई करण्यात आली असतानाही त्यांना परवानगी देण्यात आली. दरम्यान, त्यांना देण्यात आलेल्या परवानगीमध्ये रंगभूमी विभागाच्या प्रमाणपत्रासह वेटर, कॅप्टन, बार मॅनेजर, लेडिज वेटर यांच्या चारित्र्याचे प्रमाणपत्र सादर करण्यास सांगितले होते. त्यातही या बारवर यापूर्वी कारवाई झाली असतानाही त्यांना परवानगी कशी दिली, असा सवालही गृहविभागाचे प्रधान सचिव सतबीर सिंग यांनी केला आहे. याबाबतचा अहवाल सादर करताच यात त्रुटी आढळल्याने गुरुवारी त्यांच्याकडील परवानेही रद्द करण्यात आले आहेत. त्यापाठोपाठ पोलिसांनी खोटी माहिती देऊन परवाने दिल्याचे समोर येताच ताडदेव, भांडुप, मुलुंड आणि टिळकनगर पोलीस ठाण्यातील तीन पोलीस निरीक्षकांसह एका सहायक पोलीस निरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या डान्सबारच्या वादाला नवे वळण येण्याची शक्यता आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलीस प्रवक्ते धनंजय कुलकर्णी यांनी दिली. दुसरीकडे बंदी दरम्यानही मुंबईत मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या बारची छमछम सुरू असल्याचे समाजसेवा शाखेने केलेल्या कारवाईतून समोर आले. अंमलबजावणी विभागाचे उपायुक्त प्रवीण पाटील यांच्या नेतृत्वाखाली समाजसेवा शाखेने गेल्या वर्षभरात २०१ डान्सबारवर धडक कारवाई केली होती. आॅर्केस्ट्राच्या नावाखाली बीभत्स नृत्य, लहान मुलींच्या शोषणाचे प्रकार या कारवाईतून समोर आले होते. त्यात बंदी उठविल्यानंतर अतिउत्साही बारमालकांनी मोठ्या प्रमाणात डान्सबारमध्ये अवैधरीत्या छमछम सुरू केल्याने समाजसेवा शाखेनेही त्यांच्या कारवाईचा वेग वाढविला आहे. बंदी उठविल्यानंतर दिवसाआड एका बारवर कारवाई केली जात आहे. जानेवारी ते १६ मार्चपर्यंत तब्बल ३६ डान्सबारवर कारवाई करण्यात आली आहे. बंदी उठविल्यानंतर न्यायालयाने घालून दिलेल्या अटींचे पालन न झाल्यास त्यावर कारवाईचे सत्र सुरूच राहणार असल्याचे समाजसेवा शाखेचे पोलीस उपायुक्त प्रवीण पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. समाजसेवा शाखेने गेल्या वर्षभरात २०१ डान्सबारवर धडक कारवाई केली होती. आॅर्केस्ट्राच्या नावाखाली बीभत्स नृत्य, लहान मुलींच्या शोषणाचे प्रकार या कारवाईतून समोर आले होते. त्यात बंदी उठविल्यानंतरही अतिउत्साही बारमालकांनी कुठलीही तमा न बाळगता मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या डान्सबारमध्ये छमछम सुरू केली. त्यामुळे समाजसेवा शाखेनेही ठोस भूमिका घेत त्यांच्या कारवाईचा वेग वाढविला आहे. - गेल्या अडीच महिन्यांत मुंबईतील विविध ठिकाणांवरील बारवर छापा टाकून कारवाई करण्यात आली. या प्रकरणी आझाद मैदान, डोंगरी, शाहू नगर, नेहरूनगर, धारावी, चेंबूर, मुलुंड, कांदिवली, वांद्रेसारख्या विविध पोलीस ठाण्यांत गुन्हा दाखल आहे.