Join us

नवरात्रीसाठी दांडिया, घागरा-चोळी, पण जपून घ्या ‘ती’ गोळी! सततच्या सेवनाने होतोय आरोग्यावर परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2023 11:46 AM

बाप्पाच्या निरोपानंतर पितृपक्ष संपून लवकरच नवरात्र आणि अन्य सणांना सुरुवात होईल.

मुंबई : बाप्पाच्या निरोपानंतर पितृपक्ष संपून लवकरच नवरात्र आणि अन्य सणांना सुरुवात होईल. गरब्यासाठी रंगीबेरंगी घागरे, चोळ्या, मॅचिंग दागदागिने, मोजड्या, केशभूषा करण्यासाठीची शॉपिंग महिला वर्गाकडून एव्हाना झाली असेल. मात्र बऱ्याचदा या रंगात भंग टाकते ती मासिक पाळी...जी पुढे ढकलण्यासाठी डिले पीरियड गोळ्या घेतल्या जातात. या गोळ्या कधी तरी घेतल्यास त्याचा फारसा आरोग्यावर परिणाम होत नसला तरी सततचे त्याचे सेवन मात्र रेग्युलर पीरियड सर्कलमध्ये बिघाड करू शकते, असे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात.

मासिक पाळी येणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. प्रत्येक प्रौढ स्त्रीला मासिक पाळी येते. वैद्यकीय क्षेत्रातील अभ्यासकांच्या मते कधी कधी निसर्गाच्या विरोधात जाणारी नैसर्गिक गोष्ट थांबवणे हानिकारक नसते. पण जर ती रीतच बनवली आणि प्रत्येक वेळी मासिक पाळी थांबवण्यासाठी औषधांचा वापर केला तर त्याचा कुठेतरी तुमच्या शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो. जेव्हा तुम्ही मासिक पाळी वाढवण्यासाठी औषध वापरता, तेव्हा त्याचा प्रभाव सुमारे १७ दिवस टिकतो. त्यामुळे मासिक पाळीला रोखणाऱ्या औषधांचा जितका कमी वापर केला जाईल तितके चांगले असे ते सांगतात.

तेव्हा गोळ्या, कटाक्षाने टाळा!

काही महिलांना त्यांच्या मासिक पाळीचा कालावधी वाढवण्यासाठी औषधे बंद केल्यावर मासिक पाळी दरम्यान जोरदार प्रवाह, शरीरावर पुरळ उठणे, चक्कर येणे, डोकेदुखी, हार्मोन्समध्ये असंतुलनाची समस्या, मळमळ यासारख्या समस्या उद्भवू शकतात. तुम्ही स्तनपान करत असाल, गरोदर असाल किंवा गर्भधारणा होण्याची शक्यता असेल त्यावेळी या गोळ्या कटाक्षाने टाळा.

- डॉ. उमेश गायकवाड, सीनियर फॅमिली फिजिशियन

...तरच खा गोळ्या

मासिक पाळी थांबवायची असेल, तर त्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण असे सतत केल्यास नियमित येणारी पाळी उशिरा येऊन एकंदरच शरीरावर त्याचे परिणाम होऊ शकतात. त्यामुळे जेव्हा तुम्हाला त्याची खूपच गरज असेल तेव्हाच या गोळ्या घ्या, अन्यथा तुमची मासिक पाळी नैसर्गिक पद्धतीनेच येऊ द्या.

- डॉ. अशोक आनंद, स्त्रीरोग तज्ज्ञ

पीरियड डिले टॅब्लेटचा वापर काय?

  सदर टॅब्लेटचे काम पीरियड्सची तारीख वाढवणे म्हणजेच ते पुढे ढकलणे हे आहे.

  म्हणजे तुम्हाला विशिष्ठ काळात मासिक पाळी येऊ नये असे वाटत असेल तर या गोळ्या घेऊन तारीख पुढे नेली जाते.

टॅग्स :मुंबई