Join us

दिंडोशीचे प्रश्न थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारी

By admin | Published: November 04, 2015 3:43 AM

मुंबई महानगरपालिकेत १९९७पासून नगरसेवक, स्थायी समितीचे अध्यक्ष, सभागृह नेता, ९ मार्च २०१२ ते ८ सप्टेंबर २०१४पर्यंत मुंबईचे महापौर असा अनुभव दिंडोशी विधानसभा मतदारसंघाचे

- मनोहर कुंभेजकर,  मुंबईमुंबई महानगरपालिकेत १९९७पासून नगरसेवक, स्थायी समितीचे अध्यक्ष, सभागृह नेता, ९ मार्च २०१२ ते ८ सप्टेंबर २०१४पर्यंत मुंबईचे महापौर असा अनुभव दिंडोशी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील प्रभू यांच्याकडे आहे. निवडणुकीपूर्वी मतदारांना दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेसाठी सध्या ते कार्यरत आहेत. आमदार म्हणून मतदारसंघासह मुंबईचे प्रश्न थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ते मांडत आहेत. शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद म्हणून त्यांनी अनेक प्रश्न लावून धरले. पालिका आयुक्तांना दिंडोशी विधानसभा मतदारसंघात आणून रस्ता रुंदीकरणाची गरज आमदार प्रभू यांनी त्यांच्या लक्षात आणून दिली. त्यामुळे दिंडोशीतील गेल्या ३० ते ४० वर्षे रखडलेला मौर्या कम्पाउंड आणि नर्मदा लेन येथील रस्ता रुंदीकरणामुळे सुमारे एक लाख नागरिकांना याचा फायदा झाला. वाहतूक कोंडीदेखील काही प्रमाणात कमी झाली. रत्नागिरी हॉटेल ते जलाशय येथून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून कांदिवली (पूर्व) लोखंडवाला कॉम्प्लेक्सकडे जाणारा रस्ता पूर्ण करण्यासाठी केंद्रीय पर्यावरणमंत्री यांची ते भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. गेली सात वर्षे आयटी पार्क आणि म्हाडा वसाहत-नागरी निवारा परिषद येथील जोडणाऱ्या रस्त्याबाबत पाठपुरावा करून, तो गेल्या जानेवारी महिन्यात खुला करण्यात आला. त्यामुळे सुमारे २० ते २५ हजार नागरिकांची सोय झाली आहे. म्हाडा मैत्रयी सोसायटीसमोरील या रस्त्यालगत असलेली संरक्षक भिंत पूर्ण करून घेतल्याने, नागरी निवारा वसाहत क्रमांक ५-६ येथील नागरिकांना याचा फायदा झाल्याने, गुन्हेगारीला आळा बसला आहे.नागरी निवारा परिषद येथील गेली अनेक वर्षे सदनिकांच्या हस्तांतरणाचा प्रश्न महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि उपनगर जिल्हाधिकारी शेखर चन्ने यांच्याकडे पाठपुरावा करून मार्गी लावण्यात त्यांना यश आले. गणपती उत्सवाच्या वेळी कुरार येथील शांताराम तलाव येथील दुर्गंधीमिश्रित पाण्याची समस्या दूर झाली. आता येथे स्वच्छ पाणी उपलब्ध झाले आहे. म्हाडा वसाहतीतील पाणीप्रश्नासाठी येथे मोठी टाकी बांधण्यासाठी निधी उपलब्ध झाला आहे. लवकरच हे काम सुरू होईल. म्हाडा वसाहत आणि नागरी निवारा परिषद, संतोष नगर, महापालिका वसाहत येथील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणेबरोबर पाठपुरावा करून, येथील अथर्व सोसायटीलगत नवीन पोलीस चौकी नवीन वर्षात उभारली जाणार आहे. या ठिकाणी सुसज्ज उद्यानाचे काम प्रगतिपथावर आहे. लवकरच येथील उद्यानाचा लोकार्पण सोहळा होणार आहे. २०१२ साली बेस्ट प्रशासनाने बंद केलेली गोरेगाव स्थानक(पूर्व) ते आयटी पार्क बस क्रमांक ४३६ अशी वर्तुळाकार बससेवा गेल्या १ आॅगस्टला पुन्हा सुरू झाल्यामुळे येथील नागरिकांचा फायदा झाला आहे. आरे नाका आणि जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग येथील वाहतूक कोंडी आणि पाण्याच्या गंभीर समस्येकडे आमदार प्रभू यांनी लक्ष द्यावे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.