Join us  

उघड्यावर सिलिंडरचा वापर करणाऱ्यांवर दंडुका

By admin | Published: October 24, 2015 1:24 AM

मुंबईत हॉटेलमध्ये झालेल्या सिलिंडर ब्लास्टनंतर आता त्याचे पडसाद इतर शहरांतही उमटू लागले आहेत. ठाणे महापालिका हद्दीत राजरोसपणे उघड्यावर पदार्थ तयार करण्यासाठी

ठाणे : मुंबईत हॉटेलमध्ये झालेल्या सिलिंडर ब्लास्टनंतर आता त्याचे पडसाद इतर शहरांतही उमटू लागले आहेत. ठाणे महापालिका हद्दीत राजरोसपणे उघड्यावर पदार्थ तयार करण्यासाठी सिलिंडरचा वापर करणाऱ्यांवर आता कारवाई करण्यात येणार आहे. शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तसेच सर्व्हिस रोडवर ठाण मांडून बसलेल्या शोरूमवाल्यांवरही कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.शहरात आजच्या घडीला स्टेशन परिसरात सायंकाळच्या सुमारास उघड्यावर चायनीज पदार्थांच्या गाड्या लावल्या जात आहेत. परंतु, फेरीवाल्यांवर कारवाई करताना पालिकेचे याकडे लक्ष जात नाही का, असा सवाल संजय वाघुले यांनी स्थायीच्या बैठकीत उपस्थित केला. हे विक्रेते गॅस सिलिंडर वापरत असून त्यामुळे भविष्यात मुंबईसारखी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा सवालही त्यांनी केला. (प्रतिनिधी)दरम्यान, शहराची मुख्य बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या बाजारपेठेतील गोरगरीब फेरीवाल्यांवर कारवाई करण्यापेक्षा ज्यांनी सर्व्हिस रोड आणि फूटपाथ हडप केले आहेत, अशा गाड्यांसह शोरूमवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी या वेळी नगरसेवक सुधीर भगत यांनी केली. कॅडबरी, नितीन कंपनी, तीनहातनाका आदी परिसरांतील सर्व्हिस रोड हे शोरूमवाल्यांनी व्यापले असून पालिकेचे अधिकारी झोपा काढतात का, असा सवाल त्यांनी केला. विवियाना मॉलसमोरील फूटपाथ जरी मोकळे झाले असले तरीदेखील सर्व्हिस रोडवर आता फेरीवाले आले आहेत. त्यामुळे येथे वाहतूककोंडी होत असून त्यांच्याकडेसुद्धा अशा प्रकारे सिलिंडरचा वापर होत आहे. त्यामुळे येथेही भविष्यात दुर्घटना घडू शकते, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. अखेर, यासंदर्भात कारवाई करण्याचे आश्वासन अतिक्रमण उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांनी दिले. तसेच फेरीवाल्यांवर कारवाई करताना त्या शोरूमवाल्यांवरदेखील कारवाई करण्याचे आदेश सभापती नरेश म्हस्के यांनी दिले.