मुंबई : बोरीवलीमधील पोईसर गावात असलेले दोन तलाव बुजवल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला या दोन्ही तलावांचे पुनरुज्जीवन करण्याचा आदेश शुक्रवारी दिला. या दोन्ही तलावांवर भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांनी केलेले बेकायदा बांधकाम तोडण्याचा आदेशही देण्यात आला. सरकारकडून आवश्यक परवानगी न घेताच खासदार गोपाळ शेट्टी यांनी पोईसरमधील एक तलाव बुजवला; तर दुसऱ्या तलावाचा आकार कमी करण्यात आला. या तलावामध्ये बोटी चालवण्यात येत असून, नागरिकांकडून प्रवेश फी आकारण्यात येते, असा आरोप पोईसरच्या रहिवासी मीरा कामत आणि एडविन ब्रिट्टो यांनी जनहित याचिकेद्वारे केला आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठापुढे होती.याचिकेनुसार, ३३८१.६० चौ. मी.चा छोटा तलाव पूर्णपणे बुजवण्यात आला व त्यावर पोईसर जिमने मोकळे मैदान तयार केले. तर १२९२५.५९ चौ.मी.च्या तलावाचा आकार कमी करून त्यावर जॉगिंग ट्रॅक बांधला. त्यामुळे हे दोन्ही तलाव होते त्या स्थितीत आणण्याचा आदेश सरकार आणि प्रतिवाद्यांना द्यावा, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे.याचिकाकर्त्यांनी राजकीय हेतूने जनहित याचिका केली असल्याचा आरोप, गोपाळ शेट्टी व पोईसर जिमने केला आहे. छोटा तलाव बुजवण्यापूर्वीच नष्ट झाला होता; तर मोठ्या तलावाचे खासदार निधीमधून सुशोभीकरण करून नागरिकांना सुविधा उपलब्ध करून दिल्या असल्याचा बचाव उच्च न्यायालयात घेतला.‘पर्यावरण संतुलन राखण्यात तलावांचीही महत्त्वाची भूमिका आहे. तलावांचे संरक्षण करणे हे सर्वांचेच कर्तव्य आहे. चांगल्या पर्यावरणाचा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे बुजवलेला तलाव आणि आकार कमी करण्यात आलेला तलाव पुनरुज्जीवित करावेत. त्यांना मूळ स्थितीत आणावे तसेच यावर करण्यात आलेले बेकायदेशीर बांधकाम तोडण्यात यावे,’ असा आदेश कोर्टाने दिला. (प्रतिनिधी)
गोपाळ शेट्टी यांना दणका
By admin | Published: April 23, 2016 3:35 AM