डोंगरी दुर्घटना, अखेर मृतदेह दिला बहिणीच्या ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2019 06:23 AM2019-07-20T06:23:45+5:302019-07-20T06:23:51+5:30
डोंगरी दुर्घटनेत मृतावस्थेत सापडलेल्या जावेद इस्माईल (३४) याच्या कुटुंबीयांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले.
मुंबई : डोंगरी दुर्घटनेत मृतावस्थेत सापडलेल्या जावेद इस्माईल (३४) याच्या कुटुंबीयांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. गुरुवारी रात्री त्याचा मृतदेह त्याच्या बहिणीच्या ताब्यात देण्यात आला आहे.
डोंगरीमधील १०० वर्षे जुन्या असलेल्या केसरबाई या इमारतीचा अर्धा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत १३ जणांचा बळी गेला. याच दुर्घटनेत जावेदचाही मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला. मात्र, त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी कोणीच पुढे आले नाही.
याप्रकरणी पोलिसांनी केलेल्या तपासात, तो घटस्फोटीत असून, आजारपणामुळे घरात एकटाच राहत असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे पोलीस गोंधळात पडले. तरीही अन्य कोणी नातेवाईक आहेत का, याचा तपास त्यांनी नव्याने सुरू केला. त्यावेळी त्याच्या बहिणी जवळपास राहत असल्याची माहिती डोंगरी पोलिसांनी मिळाली.
त्यानुसार अधिक चौकशीअंती जावेदचा मृतदेह गुरुवारी रात्री त्याची बहीण शबनम शेख (५३) हिच्या ताब्यात देण्यात आला, अशी माहिती डोंगरी पोलिसांनी दिली.