मुंबई : पावसाळ्यात वातावरणातील चढउतार, दूषित पाणी पिणे किंवा स्वच्छ पाण्यात साठणारे डास अशा विविध कारणांमुळे साथीच्या आजारांचा धोका असतो. यंदा, कोरोना महामारी सुरू असताना अशा साथीच्या आजारांपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी. कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळत इतर डेंग्यू, मलेरिया आजारांपासूनही स्वत:चा बचाव करावा, असे आवाहन तज्ज्ञ डॉक्टर करत आहेत.
मागील वर्षी पावसाळ्याच्या काळात कोरोना महामारीची पहिली लाट सुरू होती. मात्र, त्या वेळी डेंग्यू, स्वाइन फ्लूसह सर्वच पावसाळी आजारांचा संसर्ग दरवर्षीच्या तुलनेत मर्यादित राहिल्याचे दिसून आले. यंदा काही प्रमाणात या आजारांचे रुग्ण आढळणे सुरू झाले आहे. त्यामुळे नागरिकांना सुरुवातीपासूनच काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत. जनरल फिजिशियन डॉ. विकास बनसोडे म्हणाले, पावसाळ्यात प्रामुख्याने दिसणारे ताप, सर्दी, खोकला, श्वसनाचे आजार आणि पोटाचे आजार दिसण्यास सुरुवात झाली आहे. हे सर्वच आजार मागील वर्षी तुलनेने कमी होते, त्यामुळे नागरिक यंदा गाफील राहण्याची शक्यता आहे. मात्र, तसे होऊ नये यासाठी नागरिकांना सावध करणे आवश्यक आहे. डेंग्यूपासून बचावासाठी घराच्या परिसरात डास होऊ नयेत याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. उघड्यावरचे खाणे किंवा पाणी पिणे टाळावे. ताप, सर्दी, खोकला, श्वसनाचे आजार यांची लक्षणे दिसताच अंगावर न काढता डॉक्टरांना दाखवावे, असेही डॉ. बनसोडे यांनी सांगितले.
फिजिशियन डॉ. शरद आगरखेडकर म्हणाले, मुलांमध्ये विषाणूजन्य आजाराचे कोणतेही लक्षण दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. लक्षणे सारखी असल्याने किमान प्रतिजन चाचणीद्वारे कोरोना संसर्ग नाही हे निश्चित करावे. ताप आणि अंगावर लाल चट्टे असल्यास चौथ्या दिवसानंतर डेंग्यूची चाचणी करणे आवश्यक आहे. मुलांमध्ये कांजिण्यांचा संसर्गही दिसत असल्याने त्या दृष्टीनेही मुलांकडे लक्ष ठेवावे. पोटाचे आजार टाळण्यासाठी उकळून थंड केलेले पाणी मुलांना पिण्यास द्यावे. काही जीवाणूजन्य आजारांमध्ये प्रतिजैविक औषध देणे आवश्यक असते, त्यामुळे स्वत:च्या मनाने मुलांवर औषधोपचार करू नयेत, असेही डॉ. आगरखेडकर यांनी स्पष्ट केले.
हे करा
* पावसात भिजणे टाळा. भिजल्यास तातडीने कपडे बदलून अंग, केस पुसून कोरडे करा.
* उघड्यावरचे पदार्थ खाणे, पाणी पिणे टाळा.
* घरी केलेले ताजे, गरम जेवण घ्या.
* विषाणूजन्य आजारांची लक्षणे दिसताच डॉक्टरांना भेटा.
* स्वत:वर किंवा लहान मुलांवर मनानेच औषधोपचार करू नका.
* पाणी साठवून खूप दिवस ठेवू नये, त्यात डासांची पैदास होण्याचा धोका असतो.