मुंबईकरांना डेंग्यूचा धोका

By Admin | Published: September 15, 2015 04:55 AM2015-09-15T04:55:23+5:302015-09-15T04:55:23+5:30

दोन दिवस ताप येणे, थंडी वाजणे, डोकेदुखी असा त्रास गेल्या १० ते १२ दिवसांत मुंबईकरांना जास्त प्रमाणात जाणवू लागला आहे. बदलत्या हवामानामुळे काहींना हा त्रास होत

Danger of Dengue to Mumbaikars | मुंबईकरांना डेंग्यूचा धोका

मुंबईकरांना डेंग्यूचा धोका

googlenewsNext

मुंबई : दोन दिवस ताप येणे, थंडी वाजणे, डोकेदुखी असा त्रास गेल्या १० ते १२ दिवसांत मुंबईकरांना जास्त प्रमाणात जाणवू लागला आहे. बदलत्या हवामानामुळे काहींना हा त्रास होत असून डेंग्यू आणि मलेरियाची लागण होण्याचे प्रमाण वाढले आहे. सप्टेंबर आणि आॅक्टोबर महिन्यात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढते, यामुळेच नागरिकांनी अधिक काळजी घ्यायचे आवाहन महापालिका आणि डॉक्टर करीत आहेत.
आॅगस्ट महिन्यापर्यंत स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या अधिक होती. पण सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून स्वाइनच्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. पण त्याचवेळी डॉक्टरांकडे ताप, थंडी वाजणे, अंगदुखी, डोकेदुखीच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. अनेकांना एक ते दोन दिवस कणकण येते अथवा ताप येतो. ताप असतानाच त्यांना थंडी भरते, डोके दुखायला लागते, अंगदुखी होते. हा त्रास कमी झाल्यावर अनेकांना अशक्तपणा जाणवू लागतो. यामुळे असा त्रास जाणवू लागल्यास विशेष काळजी घेतली पाहिजे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
यंदा पाऊस कमी झाला असला तरी पुन्हा पावसाची सुरुवात झाली आहे. यामुळे मुंबईकरांनी काळजी घेतली पाहिजे. रोज आमच्याकडे येणाऱ्या रुग्णांपैकी ८ ते १० रुग्णांना ताप, थंडी, अंगदुखीचा त्रास असतो. बदलत्या वातावरणाचा परिणामामुळे व्हायरल फिवर येतो. व्हायरल फिवर असणाऱ्यांनाही कधीतरी थंडी भरते. पण दोन दिवसांहून अधिक काळ ताप राहिल्यास तपासणी केल्यावर डेंग्यूचे निदान होते, तर काहींना मलेरियाची लागण झाल्याचे निदान होते. सोसायट्यांमध्ये राहणाऱ्यांना डेंग्यू आणि झोपडपट्टीसदृश ठिकाणी राहणाऱ्यांना मलेरिया होण्याचे प्रमाण अधिक आहे. कारण डेंग्यूच्या डासांची पैदास स्वच्छ पाण्यात तर मलेरियाच्या डासांची पैदास ही घाणेरड्या पाण्यात होते. घरात आणि घराच्या बाजूला पाणी साठू न देणे हा उत्तम प्रतिबंध असल्याचे फॅमिली फिजिशियन डॉ. प्रदीप शहा यांनी सांगितले.

घरात कुठे होते डासांची पैदास
झाडांच्या कुंड्याखाली ठेवलेल्या प्लेट्स. फेंगशुई प्लॅण्ट, मनीप्लॅण्ट. एसीच्या डक्टमध्ये. सात दिवसांपेक्षा अधिक दिवस भरून ठेवलेले पाणी

ताप आल्यास काय करावे ?
डॉक्टरच्या सल्ल्याने औषध घ्यावे. जास्त प्रमाणात पाणी प्यावे, ज्युस प्यावे. फळे, भाज्या खाव्यात. आराम करावा

घरात होणाऱ्या डासांची पैदास रोखा
सप्टेंबर आणि आॅक्टोबर महिन्यात दरवर्षी डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत थोडी वाढ होते. मच्छरांमुळे डेंग्यूची लागण होते. मुळात ८० टक्के डेंग्यूच्या डासांची पैदास ही घरात साचलेल्या पाण्यात होते. यामुळे डेंग्यू रोखण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभागाची आवश्यकता आहे. घरात कुठेही थोडे पाणीही साचणार नाही याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. असे झाल्यास डेंग्यू सहज रोखता येऊ शकतो.
-डॉ. मिनी खेत्रपाल, प्रमुख, साथरोग नियंत्रण कक्षप्रमुख

Web Title: Danger of Dengue to Mumbaikars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.