मुंबईतील तज्ज्ञांनी केल्या शहरातील कमी होत चाललेल्या फ्लेमिंगोंच्या संरक्षणासाठी शिफारशी
मुंबई : १९८० च्या दशकापासून सप्टेंबर ते एप्रिल या काळात ठाणे खाडीत ३० हजार ते ४ हजार फ्लेमिंगो वस्ती करत आले आहेत. चाळीस वर्षांपूर्वी फ्लेमिंगोंना शहरात राहण्यासाठी आदर्श परिस्थिती होती. पण आज फ्लेमिंगोंची वस्ती स्थाने आक्रसलेली दिसत आहेत. अनेक भागातील बांधकामांमुळे पाणथळ जागा सातत्याने नष्ट होत आहेत आणि फ्लेमिंगोंना छोटया जागेत राहावे लागत आहे, अशी नाराजी तज्ज्ञांनी व्यक्त केली.
मुंबईतील मानाच्या पक्ष्याचे अस्तित्व साजरे करण्यासाठी तसेच कमी होत चाललेल्या फ्लेंमिंगोंचे संरक्षण करण्यासाठी शनिवारी जागतिक स्थलांतरित पक्षी दिनाच्या निमित्ताने द फ्लाइट ऑफ द पिंक - हाऊ कॅन मुंबई प्रोटेक्ट द लेसर फ्लेमिंगो या शीर्षकाखाली वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. हा वेबिनार बायोडायव्हर्सिटी बाय द बे या अभियानाचा भाग म्हणून आयोजित करण्यात आला होता. जैवविविधता संरक्षणाचा मुद्दा सर्वांसमोर आणण्याच्या हेतूने मुंबईकरांनी मिळून सुरू केलेल्या मिनिस्ट्री ऑफ मुंबईज मॅजिक या नागरिकांच्या सामूहिक संस्थेने हे अभियान हाती घेतले आहे.
मुंबईच्या ओळखीचा भाग झालेल्या फ्लेमिंगोंवर अशाश्वत विकासाचा विपरित परिणाम होत आहे. याची दखल घेण्यासाठी वन्यजीव विषयक चित्रपटकर्त्या अशीमा नरेन, मॅनग्रोव्ह सेलचे सीसीएफ आणि प्रमुख वीरेंद्र तिवारी, लीगल इनिशिएटिव्ह फॉर फॉरेस्ट अँड एन्व्हॉर्न्मेंट ऋत्विक दत्ता, वनशक्ती संस्थेतील प्रकल्प संचालक स्टॅलिन दयानंद हे यात सहभागी झाले होते. स्टॅलिन दयानंद म्हणाले, नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि जेएनपीटीच्या विस्तारासाठी २ हजार हेक्टरच्या पाणथ जाग गमावल्यानंतर फ्लेंमिंग आणि पाणथळ पक्ष्यांचा निवारा आधीच्या तुलनेत २० टक्केच राहिला आहे. ठाणे क्रीक फ्लेमिंगो सँक्च्युरी अशा १.५ लाख पक्ष्यांसाठी एक महत्त्वपूर्ण क्षेत्र आहे, जसे की मॅनग्रोव्ज, गवताची जमीन, जलाशय; या सर्वांना जोडले गेले पाहिजे. सध्या ६० टक्क्यांहून अधिक निवास सँक्च्युरीच्या सीमेबाहेर ठेवण्यात आले आहेत, जेणेकरून नंतर रिअल इस्टेट आणि इतर प्रकल्पांना फायदा होईल.
दरम्यान, नवी विमानतळ असो, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक असो; अशा अनेक प्रकल्पांमुळे फ्लोमिंगाना फटक बसत आहे. बुलेट ट्रेनदेखील फ्लेमिंगोचे नुकसान करणार आहे. अशा विकासामुळे आपण पर्यावरण आणि साहजिकच फ्लेमिंगांची वस्तीस्थाने गमावून बसू.