महाड : गेल्या २४ तासात पडलेल्या मुसळधार पावसामुळे सावित्री, गांधारी व काळ नद्या दुथड्या भरून वाहू लागल्या असून नद्यांच्या किनाऱ्यावरील गांवाना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. या नद्यांचे पाणी महाड शहरातील सखल भागात शिरल्याने दस्तुरी नाका मार्ग, गांधारी नाका परिसर, क्रांतीभूमी येथे पुराचे पाणी शिरले असून पावसाचा जोर कायम राहिला तर शहराला पुराचा धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.गेल्या २४ तासात महाड तालुक्यात ३७ मीमी पावसाची नोंद झाली असून सावित्री नदीचा उगम असलेल्या महाबळेश्वर येथे अधिक पाऊस पडत असल्याने या नद्यांच्या पातळीत काल रात्री अचानकपणे वाढ झाली. आज सकाळी ११ वा. गांधारी नदीचे पाणी शहरातील दस्तुरी मार्गावर शिरल्याने गांधारी नदीवरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. सकाळपासून पूरपरिस्थितीची कल्पना आल्यामुळे बाजारपेठेतील व्यापारी व नागरिकांची आपल्या दुकानातील व घरातील सामानांची आवराआवर करण्यास सुरुवात केली. यामुळे दुपारनंतर शहरातील जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र दिसून आले. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांनी शहराकडे आज फिरकले नसल्याचे निदर्शनास आले. शहरातील पुराच्या शक्यतेमुळे शाळा दुपारनंतर सोडण्यात आल्या.दरम्यान बिरवाडी कुंभारवाडा समोरील मार्गावर काळ नदीचे पाणी आल्याने हा मार्गही वाहतुकीस दुपारनंतर बंद झाला. (वार्ताहर)
महाड शहराला पुराचा धोका
By admin | Published: July 31, 2014 12:55 AM