संजय कांबळे, वरपगाव - पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्यास नदीचे पाणी वाढते. त्यातच खाडीस भरती आल्यास नदीचे पाणी खाडीत समाविष्ट होत नाही. परिणामी, या नदीच्या पाण्याची पातळी वाढून नदीकिनारी असलेल्या गावांतील लोकवस्तीत पुराचे पाणी शिरत़े़ अशा २२ ते २५ गावांना पुराचा धोका असल्याने त्यावर उपाययोजनेसाठी प्रशासन विचारमंथन करीत आहे. तालुक्यातील काळू नदी ही फळेगाव, रुंदे, टिटवाळा, म्हसकळ, गुरवली, वासुंद्री, सांगोडा, म्हसकळपाडा या गावांतून वाहते. उल्हास नदी रायते, मानिवली, वरप, म्हारळ, कांबा, पावशेपाडा, आपटी, मोहिली, मोहना, आणे या भागांतून वाहते. बारवी पोई, मांजर्ली तर भातसा खडवली, राये, वाळकस भागांतून, तर वालधुनी नदी उल्हासनगर तालुक्यातून येऊन कल्याण, वालधुनी, शिवाजीनगर भागांतून वाहते. कल्याणच्या पश्चिम भागालगत व भिवंडीकडील तालुक्याच्या पूर्व भागालगत खाडी आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात नागरीकरणाने लोकवस्ती वाढली आहे. विठ्ठलवाडी स्टेशनलगत खडेगोळवली, काटेमानिवली, तीसगाव या परिसरात गेल्या १५ ते १६ वर्षांत मोठ्या प्रमाणात चाळींचे बांधकाम झाले आहे. बहुतांश नागरिक बैठ्या खोल्यांमध्ये राहतात. म्हारळमध्येदेखील नैसर्गिक नाले गायब झाल्याने पुराच्या पाण्याची झळ नागरिकांना बसते. २६ जुलै २००५ च्या सार्वत्रिक पुराचा फटका म्हारळ, मानिवली, वरप, कांबा, मोहिली, आपटी, शिवाजीनगर, वालधुनी, सम्राट अशोकनगर या नागरी वस्तीला बसला होता. यावेळी मोठी जीवित व वित्तहानी झाली होती. अनेक गावांतील घरे, शेतीही वाहून गेली होती. आता या परिसरातील सखल भागांत मातीचा भराव टाकल्याने पावसाचे पाणी जाणार कसे व कोठून, अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे तहसीलदारांनी आताच या भागाकडे लक्ष द्यावे, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
नदीकाठच्या गावांना पुराचा धोका
By admin | Published: May 25, 2014 1:04 AM