Join us

कोरोनामुक्तीनंतर गँगरीनचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2021 4:06 AM

वैद्यकीय तज्ज्ञांचे निरीक्षणलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बुरशीजन्य आजार, रक्ताच्या गुठळ्या, हृदय-मेंदूविकारांच्या वाढत्या समस्या आणि आता कोरोनामुक्तीनंतर गँगरीनचाही ...

वैद्यकीय तज्ज्ञांचे निरीक्षण

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : बुरशीजन्य आजार, रक्ताच्या गुठळ्या, हृदय-मेंदूविकारांच्या वाढत्या समस्या आणि आता कोरोनामुक्तीनंतर गँगरीनचाही धोका असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा १२ रुग्णांवर मुंबईतील विविध रुग्णालयांत आतापर्यंत उपचार करण्यात आले आहेत. कोरोनामुक्त झाल्यानंतर मुख्यतः आतड्यांमध्ये गँगरीनची समस्या उद्भवत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे निरीक्षण आहे.

कोरोनामुक्तीच्या साधारणतः दीड आठवड्यानंतर आतड्याकडील भागात गुठळ्या होऊन गँगरीनचा संसर्ग झाल्याचे दिसून आले आहे. रुग्णांकडून पोटदुखीच्या तक्रारी समोर आल्यानंतर याचे निदान झाल्याचे निरीक्षण आहे. त्यामुळे पोस्ट कोविडमध्ये कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये, अशी माहिती संसर्गतज्ज्ञ डॉ. हर्षल केणी यांनी दिली.

अंधेरीतील खासगी रुग्णालयात नुकतेच ५८ वर्षीय रुग्णावर या तक्रारीवर उपचार करण्यात आले. या रुग्णाला जेवणानंतर पोटदुखीचा त्रास सुरू झाला. बराच काळ दुखणे थांबत नव्हते. या रुग्णाने कोरोना लसीचे दोन डोसही घेतले होते. त्यानंतर डॉक्टरांनी सिटीस्कॅन केल्यानंतर आतड्यांना रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये गुठळ्या झाल्याचे आढळून आले. अखेर डॉक्टरांनी गुठळ्यांमध्ये गँगरीनचा त्रास होऊ नये म्हणून वेळीच उपचार करून या गुठळ्या काढल्या. यामुळे कोरोनामुक्तीनंतरही रुग्णांनी काळजी घेऊन कोणतीही लक्षणे आढळल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा.

* छोट्या आतड्यातील रक्तपुरवठ्यावर परिणाम

एका आंतरराष्ट्रीय अहवालातील निरीक्षणानुसार, कोरोना विषाणू हा फुप्फुसांवर हल्ला करतो. हा एक पोटाचा दुर्मीळ आजार आहे. ज्यात कोरोना रुग्णांच्या आतड्यांमध्ये गुठळ्या होतात. पोटात गुठळ्या झाल्याने छोट्या आतड्यातील रक्तपुरवठ्यावर परिणाम होतो. ज्यामुळे गँगरीनची समस्या निर्माण झाली आहे. १६ ते ३० टक्के कोरोना रुग्णांमध्ये गॅस्ट्रोइन्टेस्टेनलची लक्षणे दिसून आली आहेत.

--------------------------------------