पाण्यातून चाललेल्या नागरिकांना लेप्टोचा धोका, २४ ते ७२ तासांत डॉक्टरचा घ्यावा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2020 02:00 AM2020-07-05T02:00:58+5:302020-07-05T02:01:28+5:30

अतिवृष्टी दरम्यान पावसाच्या साचलेल्या किंवा वाहत्या पाण्यातून लेप्टोस्पायरोसिस या रोगाच्या लेप्टोस्पायरा (स्पायराकिट्स) या सूक्ष्मजंतंूचा प्रादूर्भाव असू शकतो.

Danger of lepto to citizens walking on water, consult a doctor within 24 to 72 hours | पाण्यातून चाललेल्या नागरिकांना लेप्टोचा धोका, २४ ते ७२ तासांत डॉक्टरचा घ्यावा सल्ला

पाण्यातून चाललेल्या नागरिकांना लेप्टोचा धोका, २४ ते ७२ तासांत डॉक्टरचा घ्यावा सल्ला

Next

मुंबई : गेले चार महिने कोरोनाचा सामना करणाऱ्या मुंबईकरांवर आता पावसाळी आजारांचे संकट घोंघावत आहे. गेले दोन दिवस पावसाने मुंबईत जोर धरला असल्याने अनेक भागांमध्ये पाणी साचू लागले आहे. यामुळे लेप्टोच्या रुग्णसंख्येत वाढ होण्याचा धोका निर्माण झाला आहे. परिणामी खबरदारी म्हणून पायाला जखमा असलेल्या व्यक्ती पावसाच्या पाण्यातून चालत गेल्या असल्यास त्यांनी २४ ते ७२ तासांच्या आत वैद्यकीय सल्ला घेऊन प्रतिबंधात्मक औषधोपचार करावा, अशी सूचना पालिकेच्या आरोग्य विभागाने केली आहे.
असा होतो लेप्टो..
अतिवृष्टी दरम्यान पावसाच्या साचलेल्या किंवा वाहत्या पाण्यातून लेप्टोस्पायरोसिस या रोगाच्या लेप्टोस्पायरा (स्पायराकिट्स) या सूक्ष्मजंतंूचा प्रादूर्भाव असू शकतो. उंदीर, कुत्रे, घोडे, म्हशी या प्राण्यांच्या मूत्रातून लेप्टोचे सूक्ष्मजंतू पावसाच्या पाण्यात संसर्गित होतात. अशा बाधित झालेल्या पाण्यातून चालत गेलेल्या व्यक्तीला लेप्टोची बाधा होण्याची शक्यता असते. तसेच त्या व्यक्तीच्या पायाला किंवा शरीराच्या कोणत्याही भागाला जखम असेल, अथवा साधे खरचटलेले जरी असेल तरी अशा छोट्याशा जखमेतूनसुद्धा लेप्टोचे जंतू माणसाच्या शरीरात प्रवेश करतात, अशी माहिती उपकार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली. कमी जोखीम, मध्यम आणि अतिजोखीम या गटातील व्यक्तीला डॉक्टरांच्या सल्ल्याने डॉक्सिसायक्लीन (२०० मिलीग्रॅम) या कॅप्सूल दिल्या जातात. याचे प्रमाण डॉक्टर निश्चित करून देतात, असे पालिकेने स्पष्ट केले आहे. गरोदर स्त्रिया व आठ वर्षांखालील बालकांना अन्य उपचार दिले जातात.

अशी घ्या काळजी...
पावसाळ्यात कोणताही ताप डेंग्यू, मलेरिया अथवा लेप्टोस्पायरोसिस असू शकतो. त्यामुळे तापाकडे दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
पायावर जखम असल्यास साचलेल्या पाण्यातून ये-जा करणे टाळावे किंवा गमबुटाचा वापर करावा. घरी गेल्यावर पाय साबणाने स्वच्छ धुऊन कोरडे करावे.
ताप आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. पुरेशी विश्रांती, पोषक आहार व वेळेत उपचार घ्यावा. घुशींचा नायनाट करावा.
उंदीर नियंत्रणासाठी उंदराला अन्न मिळू न देणे, उंदरासाठी सापळे ठेवणे, त्याला विष घालणे इत्यादी मार्ग तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार वापरात आणावे. कचरा साठणार नाही, याची दक्षता घ्यावी.

अशी आहेत लक्षणे
ताप, तीव्र डोकेदुखी, थंडी वाजणे, स्नायुदुखी, उलटी, कावीळ, रक्तस्राव अशी या रोगाची लक्षणे आहेत. रुग्णांना श्वासोच्छवास करण्यास त्रास होणे, मूत्रपिंड व यकृत निकामी होणे, अशी लक्षणेही आढळतात. त्यांना योग्य वेळी औषधोपचार न मिळाल्यास व्यक्तीचा मृत्यू होण्याचा धोका आहे.

यांना संसर्गाचा धोका...
पुराच्या पाण्यातून एकदाच चालत गेलेल्या व्यक्तीला लेप्टोचा संसर्ग होण्याचा धोका कमी असतो.
पुराच्या पाण्यातून चाललेल्या, पण अंगावर किंवा पायावर जखम असलेल्या किंवा चुकून पुराचे पाणी तोंडात गेलेल्या व्यक्ती या मध्यम जोखीमच्या ठरतात.
पुराच्या पाण्यातून चालल्यास किंवा सतत पुराच्या पाण्याशी संपर्कआल्यास अशा व्यक्ती अतिजोखीम या गटात मोडतात.

Web Title: Danger of lepto to citizens walking on water, consult a doctor within 24 to 72 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.