दाेन दिवस झालेल्या पावसामुळे लेप्टोचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:06 AM2021-05-19T04:06:16+5:302021-05-19T04:06:16+5:30
काळजी घेण्याचे डॉक्टरांचे आवाहन लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मागील दोन दिवस मुंबईत झालेल्या पावसामुळे साथीच्या आजारांचा धोका आहे. ...
काळजी घेण्याचे डॉक्टरांचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मागील दोन दिवस मुंबईत झालेल्या पावसामुळे साथीच्या आजारांचा धोका आहे. परिणामी, या पावसात भिजलेल्या व्यक्तींनी कोणतीही लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले. त्यात लेप्टोचा धोका अधिक असल्याने रुग्णांनी काळजी घ्यावी तसेच वेळीच औषधोपचार करावे, असेही डॉक्टरांनी नमूद केले आहे.
पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कार्यकारी अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले, मुंबईत पावसात भिजलेल्या नागरिकांना लेप्टो, डेंग्यू आणि हिवतापाचा धोका आहे. त्यामुळे लक्षणे आढळल्यास त्वरित उपचार घ्यावेत. मागील वर्षात लाॅकडाऊनमुळे पावसाळ्यातील साथीच्या आजारात ८० टक्क्यांनी घट झाल्याचे दिसून आले होते. परंतु, सध्या वातावरणातील बदलांमुळे आजाराचा धोका आहे. त्यात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने ताप आल्यास सुरुवातीच्या टप्प्यात निदान होणे महत्त्वाचे आहे.
फिजिशिअन डॉ. प्रकृती सोमण यांनी सांगितले की, कोरोना आणि साथीच्या आजारातील तापाची लक्षणे वेगवेगळी आहेत. परंतु, या दोन्ही आजारांचे लवकर निदान झाल्यास उपचारांती नियंत्रण मिळविणे सोपे होते. त्यामुळे कोणतेही घरगुती उपाय न करता रुग्णांनी वैद्यकीय सल्ला घेऊन उपचारांची दिशा ठरवावी.
.............................................