लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मलबार हिल बाबुलनाथ टेकडीवर असलेल्या पुरातन शिवमंदिरामुळे श्रावणात येथे भाविकांची प्रचंड गर्दी असते. मात्र, या टेकडी परिसरात मातीचा ढिगारा कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यावर पर्याय म्हणून बांधण्यात आलेली संरक्षण भिंतही येथे कोसळली होती. त्यामुळे या परिसरात धोका अजूनही कायम आहे.
दक्षिण मुंबईतील काही भाग टेकडी परिसर आहे. बाबुलनाथ मंदिर याच परिसरात येते. येथील काही भागात जुनी झाडे आणि भुसभुशीत माती असल्यामुळे पावसाळ्यात मातीचे ढिगारे टेकडीवरून कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.यापूर्वी भर पावसात बी.जी. खेर मार्ग येथील मलबार हिलवरील संरक्षण भिंत कोसळून रस्त्याला तडे गेले होते. त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा खारेघाट परिसरात घडली होती. टेकडीवरून मातीचा ढिगारा खाली कोसळून इमारतीच्या तळमजल्याच्या घरात शिरला होता. अशा भूस्खलनाच्या घटना येथे घडू लागल्या आहेत.
बाबुलनाथ टेकडी परिसरात झालेल्या घटना लक्षात घेता येथील उपाययोजनांसाठी निधी देण्यात आला आहे. श्रावणात येथे गर्दी होत असल्यामुळे पालिका आणि शासनाकडून योग्य त्या उपाययोजना केल्या जातील.- मंगलप्रभात लोढा, स्थानिक आमदार आणि मंत्री
वांद्रे ते दहिसर या पट्ट्यात झालेल्या २०१७च्या सर्वेक्षणानुसार उपनगर जिल्ह्यांत ५७ साइट्स आहेत. त्यापैकी ४० साइट्स या तीव्र धोकादायक आहेत.
गेल्या २० वर्षांत अनेक ठिकाणी दरडी कोसळून दुर्घटना झाल्या. त्यात आतापर्यंत ३०० पेक्षा जास्त लोकांनी जीव गमावला. ३२० हून अधिक जखमी झाले.
मुंबई महापालिका आणि म्हाडाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील ३६ पैकी २५ विधानसभा मतदारसंघांमध्ये ३२७ ठिकाणे दरडीखाली आहेत. एकूण २५७ ठिकाणांना धोकादायक म्हणून जाहीर केले आहे. या भागात २२ हजार ४८३ कुटुंबीय राहतात. त्यापैकी ९ हजार ६५७ कुटुंबीयांना प्राधान्याने स्थलांतरित करण्याची शिफारस मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळातर्फे राज्य सरकारला केली आहे.