मुंबई : पावसाळ्यादरम्यान जोराच्या पावसाने दरडी कोसळण्याची तसेच पावसामुळे डोंगरावरून येणाऱ्या पावसाच्या पाण्याच्या लोंढ्यांमुळे, जोरदार पावसाने नाल्यांना पूर येण्याची शक्यता असल्यामुळे झोपड्या वाहून जाण्याच्या संभाव्य घटना घडण्याची शक्यता असल्याने स्थानिकांनी स्वतःहून सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाद्वारे करण्यात आले. स्थलांतर न करता तेथेच राहणाऱ्या रहिवाशांनी स्वतःच्या जबाबदारीवर राहावे. नैसर्गिक आपत्तीने कोणत्याही प्रकारची दुर्घटना अथवा जीवित अथवा वित्तहानी झाल्यास प्रशासन त्यास जबाबदार राहणार नाही, असेही पालिकेने म्हटले.
विक्रोळी पश्चिम परिसरातील सूर्यानगर, पवई येथील इंदिरानगर, गौतमनगर, पासपोली, जयभीमनगर, गौतमनगर; तसेच भांडुप पश्चिम येथील रमाबाई आंबेडकरनगर भाग १ व २, नरदासनगर, गावदेवी टेकडी, गावदेवी मार्ग, टेंभीपाडा, रावते कंपाऊंड, खिंडीपाडा, रामनगर, हनुमाननगर, अशोक टेकडी, आंब्याची भरणी या ठिकाणच्या टेकडीच्या / डोंगराच्या उतारावर वसलेल्या झोपडपट्टीवासीयांना यापूर्वीच इशारा देण्यात आला. तर, दिनक्वारीमार्ग येथील गौतमनगर, पांजरापोळ तसेच वाशीनाका येथील ओम गणेशनगर, राहुलनगर, नागाबाबानगर, सह्याद्रीनगर, अशोकनगर, भारतनगर, बंजारतांडा, हशू अडवाणीनगर व एल.यू. गडकरी मार्ग येथील विष्णूनगर या ठिकाणच्या टेकडीच्या / डोंगराच्या उतारावर वसलेल्या झोपडपट्टीवासीयांनादेखील इशारा देण्यात आला.
दरडी कोसळण्याची संभाव्य ठिकाणे :
नेपियन्सी मार्गालगतच्या परिसरातील आशानगर झोपडपट्टी आणि जलदर्शन सोसायटीच्या मागील भाग; फोर्जेट हिल परिसरातील नवयुग सोसायटी आणि चंदुलाल धोबीघाटच्या पाठीमागील भाग; ब्रिच कँडी रुग्णालयाजवळील भुलाभाई देसाई मार्गालगत असणाऱ्या राजाबली लेनचा शेवटचा भाग; फोर्जेट हिल येथील रहिवासीनगर, मणियार इमारतीच्या मागील भाग, बी.एन. वाडिया चाळ, बाबुलनाथ परिसरातील लोयलका कंपाऊंड, पथ्थरवाला चाळीच्या मागील भाग, दादीशेठ लेनचा भाग; इत्यादी ठिकाणे.
-----------------------
दरडी कोसळण्याचा धोका जाणवल्यास
१. तत्काळ दूरध्वनी क्रमांकावर घटनेची माहिती द्यावी.
२. जवळपासच्या लोकांना सुरक्षित ठिकाणी उभे करावे.
३. घरातून बाहेर पडताना गॅस कनेक्शन, विद्युतप्रवाह बंद करावे.
४. घरातून बाहेर पडल्यानंतर घरातील मौल्यवान सामान आणण्याकरिता पुन्हा घरात प्रवेश करू नये.
५. अफवा पसरवू नये व अफवांवर विश्वास ठेवू नये.
६. अग्निशमन अथवा महापालिकेचे अधिकारी येऊन पाहणी करून गेल्याशिवाय घरात प्रवेश करू नये.
-----------------------
दरड कोसळल्यास
१. मदतकार्य करीत असताना दरड कोसळलेल्या ढिगाऱ्यावर उभे राहू नये.
२. जखमी झालेल्या व्यक्तींना त्वरित रुग्णालयात पोहोचवावे. लहान मुले, वृद्ध, अपंग, गरोदर महिला यांची प्राधान्याने काळजी घ्यावी.
३. मदतकार्य करणाऱ्या यंत्रणांना अडथळा निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी.
४. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तींबद्दल माहिती असल्यास ती मदत करणाऱ्या यंत्रणांना द्यावी.
-----------------------
खबरदारीचे व संरक्षणात्मक उपाय
१. दगडमातीचा प्रवाह, झाडे पडणे, दगडांचा एकमेकांमधील टकरीचा आवाज अशा प्रकारच्या अनैसर्गिक आवाजांकडे लक्ष द्यावे.
३. कुटुंबातील सदस्यांची वैयक्तिक माहिती असणारे कार्ड तयार करावे. ज्यामध्ये व्यक्तीचे नाव, पत्ता, रक्तगट, कार्यालयाचा पत्ता व दूरध्वनी क्रमांक, नातेवाइकांचा पत्ता व दूरध्वनी क्रमांक, ॲलर्जी असलेल्या औषधांची नावे, गंभीर आजार असल्यास त्याचे नाव व त्याकरिता घेत असलेल्या औषधांची नावे अशा माहितीचे कार्ड तयार करावे.