Join us  

गिरगाव चौपाटीवरील धोक्याची अग्निशमन दलाने दिली होती पुर्वसूचना

By admin | Published: February 16, 2016 1:02 PM

'मेक इन इंडिया' सप्ताहअंतर्गत गिरगाव चौपाटीवर घेण्यात आलेल्या कार्यक्रमात लागलेल्या आगीवरुन आरोप - प्रत्यारोप होत असताना अग्निशमन दलाने मात्र आम्ही अगोदरच धोक्याची सूचना दिली असल्याचं सांगितल आहे

 
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि.16 - 'मेक इन इंडिया' सप्ताहअंतर्गत गिरगाव चौपाटीवर घेण्यात आलेल्या कार्यक्रमात लागलेल्या आगीवरुन आरोप - प्रत्यारोप होत असताना अग्निशमन दलाने मात्र आम्ही अगोदरच धोक्याची सूचना दिली असल्याचं सांगितल आहे. या कार्यक्रमात नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. 
 
मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार गिरगाव चौपाटीवरील महाराष्ट्र सांस्कृतिक कार्यक्रम पार पडण्याच्या आदल्या दिवशी अग्निशमन दलाचे सहाय्यक विभागीय अधिकारी कार्ल डिसूजा यांनी स्वत: जाऊन कार्यक्रमस्थळाची पाहणी केली होती.  व्यासपीठाजवळ मोठ्या प्रमाणात शोभेच्या दारुचा वापर करण्यात आला होता, त्यावर आक्षेप घेत हे नियमांचं उल्लंघन असल्याच सांगत कार्ल डिसूजा यांनी नोटीसही बजावली होती. व्हीजक्राफ्टचे संचालक सब्बास जोसेफ यांनी मात्र अशा प्रकारची कोणतीही नोटीस मिळाली नसल्याचं सांगितल आहे. 
 
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयोजकांनी अग्निशमन दलाकडे एनओसीची मागणी केली होती ज्यानंतर डिसूजा यांनी काही अटींची पुर्तता करण्यास सांगितल होतं मात्र डिसूजा यांनी पाहणी केली असता कार्यक्रम भव्य-दिव्य व्हावा यासाठी सर्व नियमांचं उल्लंघन केल्यांचं त्यांच्या पाहणीत आलं. अग्निशमन दलाचे प्रमुख प्रभात रहांगदळे स्वत: या कार्यक्रमाला हजर होते, त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे फटाक्यांची आतिषबाजी सुरु होताच काही वेळातच ही आग लागली होती. 
 
व्यासपीठ समुद्रकिना-याजवळच असल्याने वा-यामुळे आग वाढली, तसंच व्यासपीठाखाली  मोठ्या प्रमाणात शोभेची दारु आणि  कार्बन डाय ऑक्साईड सिलेंडर ठेवण्यात आले होते ज्यामुळे आग पसरली. 
 
अग्निशमन दल आज आपला अहवाल महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांच्याकडे सोपवणार आहे ज्यानंतर आगीच नेमक कारण कळू शकेल मात्र व्यासपीठाजवळ ठेवण्यात आलेल्या शोभेच्या दारुमुळेच ही आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.