सचिन लुंगसेमुंबई : पालिका व म्हाडाकडून दरवर्षी पावसाळा येण्याआधी धोकादायक व अति धोकादायक इमारतींची यादी घोषित करत त्या इमारतीमधील रहिवाशांना सुरक्षितस्थळी जाण्याचे आवाहन केले जाते. प्रत्यक्षात अशा इमारतींबाबत कार्यवाही करताना पालिका व म्हाडा इमारतींचे पुरेसे सर्वेक्षण करत नाही व केले तर ते केवळ कागदपत्रे दाखविण्यासाठी केले जाते. मात्र, रहिवाशांच्या अडचणींचा डोंगर कुणीच समजून घेत नसल्याचे चित्र आहे.
विकासक व रहिवाशांमध्ये होणारे संबोधन, तांत्रिक अडचणी, पू र्वीपासूनच्या अडचणी, दुरुस्तीसाठी आव्हान ठरणारी आर्थिक बाजू व व इतर अडचणी, अशा अनेक मुद्यांना पालिका व म्हाडाकडून बगल दिली जाते. परिणामी पावसाळ्यात प्रशासनावर दुर्घटनांचे खापर फुटू नये म्हणून कार्यवाही होत नसल्याची खंत व्यक्त होत आहे.
- शहर विभागातील ३५, पूर्व उपनगरांतील ६५ तर पश्चिम उपनगरातील १२६ इमारतींचा समावेश
- रहिवाशांनी सुरक्षितस्थळी स्थलांतरित होण्याचे महानगरपालिका प्रशासनाचे आवाहन
रहिवाशांच्या तक्रारी काय?
धोकादायक इमारत रिकामी केली नाही तर वीज आणि पाणी कापले जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात येते. मात्र एखादी बिल्डिंग खरंच धोकादायक आहे का ? याबाबत प्रशासन स्वतः पुरेशी काळजी घेत नाही. सर्वेक्षण केवळ कागदोपत्री केले जाते. रहिवाशांचे म्हणणे नीट ऐकून घेतले जात नाही. इमारत रिकामी केल्यानंतर लगतच्या परिसरात पुनर्वसन होत नाही. दूर कुठेतरी संक्रमण शिबिरात हलविले जाते. त्याचा फटका कुटुंबाला बसतो. विकासक आणि रहिवाशांमध्ये किंवा रहिवासी आणि मालकांमध्ये वाद असेल तर हा वाद सोडविण्यावर भर दिला पाहिजे, मात्र प्रशासन त्यांची बाजू सावरण्यासाठी कायमच रहिवाशांचा बळी देते.प्राथमिक लक्षणे आर. सी. सी. फ्रेम कॉलम, बीम, स्लॅब इत्यादीच्या रचनेत बदल होत असल्याचे आढळल्यास तळमजल्याचा भाग खचल्यासारखा दिसून आल्यास. कॉलममधील भेगा वाढत असल्याचे दिसून आल्यास. कॉलममधील काँक्रीट पडत असल्याचे दिसून आल्यास. कॉलमचा भाग फुगल्यासारखा दिसल्यास. आर. सी. सी. चेंबर्स (कॉलम, बीम्स) व विटांची भिंत यातील सांधा / भेगा वाढत असल्यास. स्लॅबचे किंवा बीमचे तळमजल्याचे काँक्रीट पडत असल्यास. स्लॅब, बीम, कॉलमच्या भेगांमुळे लोखंडी शिगांचा आकार गंजल्यामुळे कमी झालेला असल्यास.
दक्षिण मुंबईतील अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींतील भाडेकरू /रहिवाशांना निष्कासनाची सूचना मिळाल्यानंतर उपनगरातील संक्रमण शिबिरांत स्थलांतरित होण्यास नकार दर्शवितात. या परिस्थितीचा सकारात्मक विचार करता आणि अपघातामुळे जीवित व वित्तहानी टाळता यावी याकरिता म्हाडाने पुनर्रचित इमारतींतील गाळे धोकादायक इमारतींतील भाडेकरू / रहिवाशांकरिता उपलब्ध करवून देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर दोन पावसाळे गेले, मात्र म्हाडा इमारतींची यादी घोषित करण्यात पलीकडे प्रत्यक्षात रहिवाशांना मदत होईल, अशी काहीच कार्यवाही करत नाही.- अंकुश कुराडे, राष्ट्रीय अध्यक्ष, स्वाभिमानी भारतीय पँथर
रिकाम्या कराव्या लागणाऱ्या इमारतीतील मुलांची शाळा, महिलेला उदरनिर्वाहासाठी करावी लागणारी नोकरी, अपुरे अर्थार्जन याने आभाळ कोसळते. ते घर सोडण्यास विरोध करतात. पोलिस कारवाई केली जाते. अशासाठी उपाययोजना म्हणून एसआरएमधील बिल्डर पर्यायी निवारा जशी ट्रान्झिट कॅम्प सारखी योजना राबविण्यात येते. तशीच सुविधा पालिकेने दिली पाहिजे.- डॉ. सुरेंद्र मोरे,गृहनिर्माण अभ्यासक
उपमुख्य अभियंता व आवश्यकतेनुसार अधिकारी यांचे पथक दक्षिण मुंबईतील धोकादायक इमारतींना प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करेल. इमारतीची परिस्थिती लक्षात घेता तेथील भाडेकरू / रहिवाशांना आवश्यकतेनुसार अथवा मागणीनुसार संक्रमण शिबिरातील गाळ्यांचे वितरण करण्याचा निर्णय देखील तत्काळ घेतला जाईल, असे म्हाडा दोन वर्षांपूर्वी म्हणाली होती, मात्र हे सगळे कागदोपत्री राहते. रहिवाशांना जेव्हा मदतीची खरी गरज असते तेव्हा प्रशासन हात वर करते ही वस्तुस्थिती आहे.विनोद घोलप, अध्यक्ष, फाईट फॉर राईट फाउंडेशन