धोकादायक इमारतींचा प्रश्न होतोय अधिक बिकट, पुनर्विकासाचा तिढा अनेक वर्षे कायम, लाखो मुंबईकर जीव मुठीत घेऊन जगताहेत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2020 03:21 AM2020-08-30T03:21:28+5:302020-08-30T03:22:02+5:30
दरवर्षी मुंबईत पावसाळ्यापूर्वी महापालिकेमार्फत मुंबईतील धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करून त्यांची यादी तयार केली जाते. धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना चेतावनी देऊन इमारत खाली करण्याची सूचना केली जाते.
मुंबई - महाडमधील इमारत दुर्घटनेपाठोपाठ गुरुवारी मुंबईत काही तासांत तीन ठिकाणी इमारतीचे भाग कोसळून दोन महिलांचा मृत्यू, तर दोन जखमी झाल्याची घटना घडली. गेल्या महिन्यात फोर्ट येथील इमारत कोसळून दहा लोकांचा मृत्यू झाला होता. प्रत्येक पावसाळ्यात धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर येतो. मात्र मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाचा तिढा अनेक वर्षे कायम आहे. त्यामुळे १६ हजार उपकरप्राप्त आणि यावर्षी ३७० धोकादायक इमारतींमध्ये लाखो रहिवासी जीव मुठीत घेऊन जगत आहेत.
दरवर्षी मुंबईत पावसाळ्यापूर्वी महापालिकेमार्फत मुंबईतील धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करून त्यांची यादी तयार केली जाते. धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना चेतावनी देऊन इमारत खाली करण्याची सूचना केली जाते. मात्र डोक्यावरील छप्पर जाण्याच्या भीतीने नागरिक धोकादायक इमारतीमध्येच जीव मुठीत घेऊन राहत असतात. या इमारतींची आवश्यक डागडुजी पावसाळ्यापूर्वी न झाल्यास दुर्घटनेची शक्यता असते. मात्र या गंभीर विषयाकडे दरवर्षी दुर्लक्ष केले जात आहे. परिणामी, दरवर्षी पावसाळ्यात इमारत अथवा इमारतीचा भाग कोसळून लोकांना नाहक जीव गमवावा लागतो.
गेल्या वर्षी डोंगरातील दुर्घटनेनंतर अनधिकृत आणि मोडकळीस आलेल्या इमारतींचा प्रश्न चर्चेत आला होता. मात्र या गंभीर समस्येवर कोणताच तोडगा न निघाल्यामुळे दोन दिवसांपूर्वी नागपुरात पुन्हा अशा घटनेची पुनरावृत्ती झाली. सहा वर्षे पुनर्विकास रखडल्यामुळे धोका वाढलेल्या नागपाड्यातील मिश्रा इमारतीचा भाग कोसळला. आतापर्यंत गेल्या सात वर्षांमध्ये ३९४५ इमारत दुर्घटनेत तीनशे निष्पाप जीवांचा बळी गेला आहे. यावर्षी ४४३ धोकादायक इमारतींपैकी प्राप्त इमारती खाली करण्यात पालिकेला यश आले आहे.
सन २०१३ ते २०१९ या कालावधीत मुंबईत ३९४५ इमारत दुर्घटनेत तीनशे लोकांचा मृत्यू झाला. तर ११४६ जण जखमी झाले आहेत. या कालावधीत दरवर्षी इमारत दुर्घटनेचा आकडा वाढतच गेल्याचे दिसून येत आहे.
धोकादायक इमारती अधिक असलेले विभाग
एन-घाटकोपर ५२, एच पश्चिम-वांद्रे प ५१, टी-मुलुंड ४९, के पश्चिम-अंधेरी, विले पाल ३७, के पूर्व-अंधेरी पूर्व, जोगेश्वरी ३१, पी उत्तर-मालाड २८, एच पूर्व-सांताक्रुझ, खार, वांद्रे पूर्व २७
घाटकोपर, वांद्रे येथे सर्वाधिक धोकादायक
यावर्षी पावसाळ्यापूर्वी केलेल्या पाहणीनुसार मुंबईमध्ये धोकादायक सी १ श्रेणीतील ४४३ इमारती असून, यामध्ये महापालिकेच्या ५६, शासनाच्या २७ तर ३६० या खासगी इमारती आहेत. यापैकी ७३ इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत. तर १४४ इमारतींमधील रहिवाशांनी आपली जबाबदारी स्वीकारत तिथेच राहण्याचे निश्चित केले आहे. सर्वाधिक धोकादायक इमारती घाटकोपर आणि वांद्रे विभागात आहेत. या सर्व धोकादायक इमारतींना टप्प्याटप्प्याने भेट देऊन या ठिकाणी राहणाऱ्या रहिवाशांच्या भावना काय? हे जाणून घेणार असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केले आहे.
अनेक ठिकाणी धोकादायक उपकरप्राप्त इमारतींचे मालक स्वत: विकासकाकडून इमारतीची पुनर्बांधणी करण्यात वेळ घालवतात. या इमारती म्हाडाच्या अखत्यारित असल्याने महापालिका अशा इमारतींना फक्त नोटीस देऊ शकते. मात्र हा तिढा कायमस्वरूपी सोडवायचा असल्यास मालकाचे अधिकार कमी करून कायद्यामध्ये बदल होण्याची गरज आहे.
- किशोरी पेडणेकर, महापौर, मुंबई महापालिका
अशा आहेत अडचणी...
1मुंबईत १६ हजार उपकरप्राप्त इमारतींमध्ये जवळपास आठ लाख रहिवासी वास्तव्य करीत आहेत. या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न गेली अनेक वर्षे रखडला आहे.
2तसेच मुंबईतील अनेक ठिकाणी इमारतीचा पुनर्विकास सुरू झाल्यानंतर काम अर्धवट सोडून विकासक पळ काढतात. तर अनेक वेळा अशा इमारतींच्या मालकांकडून महापालिकेच्या कारवाईवर न्यायालयातून स्थगिती आणण्यात येते.
3त्यामुळे स्थगिती मिळालेल्या प्रकरणांचा आता महापालिकेमार्फत पाठपुरावा केला जात आहे. धोकादायक इमारतीच्या मालकाला दर महिन्याला नोटीस देण्याचे निर्देश महापौरांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
443 धोकादायक इमारती
यावर्षी धोकादायक इमारतींपैकी प्राप्त इमारती खाली करण्यात पालिकेला यश आले आहे.
आतापर्यंत गेल्या सात वर्षांमध्ये ३९४५ इमारत दुर्घटनेत 300 निष्पाप जीवांचा बळी