Join us

धोकादायक गीतांजली इमारत कोसळली; बोरिवलीतील तीन कुटुंबे मात्र सुखरूप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2022 5:52 AM

बोरिवलीत अति धोकादायक म्हणून घोषित केलेली गीतांजली इमारत ही पत्त्यांसारखी कोसळली.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई :बोरिवलीत शुक्रवारी दुपारी १२.३० वाजता अति धोकादायक म्हणून घोषित केलेली गीतांजली इमारत ही पत्त्यांसारखी कोसळली. मात्र, त्यात राहणारी तिन्ही कुटुंबे सुरक्षित असल्याची माहिती पालिका उपायुक्त डॉ. भाग्यश्री कापसे यांनी पत्रकारांना दिली.

बोरिवली पश्चिमेतील साईबाबानगर येथील साईबाबा मंदिराजवळ ही धोकादायक गीतांजली इमारत आहे, ज्यात तीन कुटुंबे राहत होती. शुक्रवारी १०.३० वाजेच्या सुमारास या इमारतीमध्ये राहणाऱ्यांना काही कंपने जाणवली. त्यामुळे ते सर्व बाहेर पडले. त्यानंतर  दुपारी साडेबाराच्या सुमारास इमारत कोसळली, त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यामुळे सर्वत्र तणावाचे वातावरण होते. इमारतीखाली काही लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. ही माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाच्या किमान ८ गाड्या, दोन रेस्क्यू व्हॅन, पोलीस व पालिकेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.  ढिगारा हटविण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. अग्निशमन दलाचे कर्मचारी ढिगाऱ्याखाली कोणी अडकले आहेत का, ते तपासत होते. मात्र, असे काहीच आढळले नाही.  आर - मध्य वॉर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इमारत जीर्ण घोषित करण्यात आली होती आणि ती रिकामी करण्यात आली होती.

इमारत का पाडली नाही?

या इमारतीचे प्रकरण न्यायप्रविष्ट होते. त्यामुळे पालिकेने ती पाडली नाही, असे डॉ. कापसे म्हणाल्या. मात्र, मी तिन्ही कुटुंबीयांशी संपर्क केला असून, कोणालाही इजा झाली नसल्याचे त्यांनी नमूद केले.

टॅग्स :बोरिवली