मुंबई-गोवा महामार्गावरील धोकादायक दरड हटविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2020 01:58 AM2020-06-09T01:58:41+5:302020-06-09T01:59:05+5:30
खारेपाटण येथे महामार्गावर अनेक समस्या : बांधकाम अभियंत्यांकडून पाहणी, कामे पूर्ण करण्याचे आश्वासन
खारेपाटण : मुंबई-गोवा महामार्ग क्र.६६च्या खारेपाटण येथील झालेल्या कामांनंतर निर्माण झालेल्या समस्या ग्रामस्थांनी महामार्ग प्राधिकरणाकडे मांडल्या होत्या. त्याची गंभीर दखल घेत शनिवारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अमोल ओटवणेकर यांनी प्रत्यक्ष जागेवर जात खारेपाटण महामार्गावरील विविध समस्यांची माहिती जाणून घेतली. सद्यस्थितीत तिथे सुरक्षित अंतर ठेवून बॅरिकेट्स लावण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच धोकादायक दरड पावसाचे प्रमाण बघून महामार्गापासून अजून सुमारे १५ मीटरपर्यंत लांब तोडण्यात येणार असल्याचे ओटवणेकर यांनी सांगितले.
खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत यांनी यावेळी मुंबई-गोवा महामार्गावरील विविध समस्या दाखविल्या. यामध्ये कोर्ले-पोंभुर्लेकडे खारेपाटण येथून जाणारा रस्ता थेट सर्व्हिस रस्त्याला जोडण्यात यावा. बॉक्सवेलच्या दोन्ही बाजूने असलेल्या सर्व्हिस रस्त्याला पक्की गटार लाईन बांधून देण्यात यावी. खारेपाटण जुने वरचे स्टँड येथील खचलेला महामार्ग दुरुस्त करण्यात यावा. खारेपाटण कालभैरव मंदिराकडे जाणारा रस्ता तसेच खारेपाटण बसस्थानकाकडे जाणारा रस्ता हे दोन्ही रस्ते तीव्र उताराचे झाले असल्याने त्यांचा तीव्र उतार कमी करण्यात यावा.
खारेपाटण वरचे स्टँड येथे मुंबई - गोवा महामार्गावर नव्याने बस स्टॉप बांधण्यात यावा. खारेपाटण रामेश्वरनगर येथील बौद्ध स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्यात यावे. मुंबई-गोवा महामार्गाच्या बांधकामामुळे महामार्गालगत लागून असलेल्या घरांमध्ये रस्त्यावरील पाणी जाऊ नये म्हणून उपाययोजना करावी, या मागणी केलेल्या सर्व समस्यांची प्रत्यक्ष पाहणी अभियंता अमोल ओटवणेकर यांनी केली. ही सर्व कामे तातडीने करण्यात येतील असे आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना दिले. ग्रामस्थांच्या मागणीनुसार योग्य ते निर्णय घेणार असल्याचे ओटवणेकर यांनी स्पष्ट केले.
‘लोकमत’च्या वृत्ताची तातडीने घेतली दखल
खारेपाटण येथील मुंबई-गोवा महामार्गावरील व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावरील खारेपाटण तपासणी नाका येथील ‘धोकादायक दरडीमुळे तपासणीकरिता उभ्या असलेल्या वाहनांना धोका’ असे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले होते. याची तत्काळ दखल घेत कणकवली तहसीलदार आर. जे.पवार यांनी लगेच दुसºया दिवशी खारेपाटण तपासणी नाक्याला भेट देऊन पाहणी केली होती. तसेच महामार्ग प्राधिकरणाला कार्यवाहीबाबत सूचना दिल्या होत्या. तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता अमोल ओटवणेकर यांनी महामार्ग प्राधिकरणच्या कर्मचारीवर्गाला घेऊन या धोकादायक दरडीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी ग्रामस्थही उपस्थित होते.