तिवरांच्या प्रदेशात वाढत्या कचऱ्याने जलचर धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 02:19 AM2018-05-18T02:19:40+5:302018-05-18T02:19:40+5:30
कांदिवली पश्चिमेकडील चारकोप येथील तिवरांच्या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर कचरा साचला आहे.
मुंबई : कांदिवली पश्चिमेकडील चारकोप येथील तिवरांच्या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर कचरा साचला आहे. सेक्टर ८मध्ये राहणाºया काही रहिवाशांकडून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असून, महापालिकेच्या सफाई कामगारांकडूनही कचºयाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे.
पर्यावरणप्रेमींनी दिलेल्या माहितीनुसार, तिवरांच्या प्रदेशात कागदपत्र, प्लॅस्टिक कचरा जाळण्यात येत आहे. हा गैरप्रकार रोखण्यासाठी अनेकवेळा प्रशासनाकडे तक्रार केली, मात्र त्यावर कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. वनविभागाने स्थानिकांनाही तिवरांच्या झाडांविषयीचे महत्त्व पटवून देत कचरा टाकण्यास मज्जाव करण्याची गरज पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे.
तिवरांच्या प्रदेशात सिमेंट कचरा, फर्निचर, प्लॅस्टिक कचरा, चिनी मातीची भांडी यांचा कचरा साचल्याची माहिती पर्यावरणवादी मिली शेट्टी यांनी दिली. त्या म्हणाल्या, काही दिवसांपूर्वी काही रहिवासी कचरा जाळत असल्याचे दिसत असताना त्यांना रोखायचा प्रयत्न केला. मात्र तरीदेखील त्यांनी कचरा जाळला. कचरा जाळल्यामुळे या ठिकाणी कार्बन डायआॅक्साईडचे प्रमाण वाढत आहे. असे प्रकार वारंवार होत असल्याने या भागातील अन्नसाखळी विस्कळीत होत असून, अनेक जीव नष्ट होत आहेत. स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींमध्ये तिवरांच्या झाडांविषयी जनजागृती करण्याची गरजही त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
सेक्टर ८च्या परिसरात अनेक प्रकारचे पशू-पक्षी दिसून येतात. नुकताच तिवरांच्या प्रदेशात कोल्हा दिसून आला होता. तसेच या भागातील तलावाजवळ खंड्या, घुबड, कोकीळ, हळद्या, वंचक, सुगरण, चातक, दयाळ यांसारखे सुमारे ५५ प्रजातीचे पक्षी दिसून येतात. मात्र, वाढत्या कचºयाच्या दुर्गंधीमुळे गेल्या काही महिन्यांपासून या ठिकाणी काही पक्षांनी पाठ फिरवली आहे. सफाई कामगारांना कचरा नेण्याचा त्रास होत असल्याने ते या भागातच कचरा टाकून जात असल्याचा गंभीर आरोपही शेट्टी यांनी केला आहे. तलावातील पाणी आटत चालले असल्याने वन्यजीव येथील प्रदेश सोडून जाण्याची भीतीही शेट्टी यांनी व्यक्त केली आहे.
>संरक्षणासाठी लोकसहभागाची गरज
पर्यावरणप्रेमींनी आतापर्यंत वांद्रे, गोराई, शिवडी, भांडुप येथील तिवरांच्या प्रदेशातून ८ हजार टन कचरा उचलला आहे. यापुढेदेखील इतर ठिकाणच्या भागातील कचरा उचलण्याची मोहीम हाती घेतली जाणार आहे. मात्र मोठ्या प्रमाणात तिवरांचे रक्षण करण्यासाठी लोकसहभागाची गरज आहे.
- सारथी गुप्ता, पर्यावरणप्रेमी
>तिवराच्या झाडांचे महत्त्वपूर्ण काम
नदीने वाहून आलेला कचरा व समुद्रातील कचरा तिवरांच्या मुळाशी अडकतो. हा कचरा समुद्रात जात नसल्याने पाणीप्रदूषणाला लगाम बसतो. अनेक जलचर प्राण्यांचे वास्तव या ठिकाणी असते. तिवरांच्या परिसरात मासे अंडी घालतात. अनेक पशू-पक्ष्यांची अन्नसाखळी तिवरांमुळे सुरू आहे. वातावरणातील कार्बन डाय आॅक्साईड कमी करण्याचे काम तिवर करतात.