गोंगाटाचा हृदयाला धोका
By admin | Published: September 8, 2016 03:52 AM2016-09-08T03:52:05+5:302016-09-08T03:52:05+5:30
डीजे, ढोल-ताशाच्या गजरात बाप्पांचे आगमन झाले, पण सतत दहा दिवस लाउडस्पीकर, वाहनांचे हॉर्न, फटाके यांच्या सततच्या आवाजांमुळे आरोग्यावर परिणाम होतो.
मुंबई : डीजे, ढोल-ताशाच्या गजरात बाप्पांचे आगमन झाले, पण सतत दहा दिवस लाउडस्पीकर, वाहनांचे हॉर्न, फटाके यांच्या सततच्या आवाजांमुळे आरोग्यावर परिणाम होतो. कान, हृदयावर सततच्या ध्वनिप्रदूषणाचा गंभीर परिणाम होतो. म्हणूनच उत्सव आनंदात साजरा करण्यासाठी ध्वनिप्रदूषण कमी करा, असा सल्ला डॉक्टरांनी मुंबईकरांना दिला आहे.
गेल्या काही वर्षांत गणेशोत्सवाचे स्वरूप पालटले आहे. काळानुरूप मुंबईकरांनी गणेशोत्सवातील बदलांचा स्वीकार केला असला, तरीही डीजे, लाउडस्पीकरच्या आवाजामुळे कायमचा बहिरेपणा अथवा काही काळासाठी ऐकायला न येणे हा त्रास होण्याचा धोका वाढत असल्याचे, नायर रुग्णालयातील कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. धिरजकुमार नेमाडे यांनी सांगितले.
डॉ. धिरजकुमार पुढे म्हणाले, ‘सातत्याने ८ तास ९० डेसिबलपेक्षा जास्त आवाज कानावर पडल्यास श्रवण क्षमतेवर परिणाम होतो. १६० डेसिबल इतका आवाज काही तास कानावर पडल्यास कानाचा पडदा फाटू शकतो. त्याचबरोबर, कानांच्या नसांवर परिणाम होऊ शकतो. यावर तत्काळ उपचार झाले नाहीत, तर कायमचा बहिरेपणा येऊ शकतो. सातत्याने कानावर आवाज पडत राहिल्यास कायमचा बहिरेपणा येऊ शकतो. अनेकदा कानात दडा पडतो, तर काही वेळा कानात शिट्टी वाजल्यासारखा आवाज ऐकू येतो, याला वैद्यकीय भाषेत टीनीटस असे संबोधितात. आगमन आणि विसर्जन सोहळ््यात गुलालाचा वापरही मोठ्या प्रमाणात होतो. गुलाल नाका-तोंडात गेल्याने संसर्ग होऊ शकतो. कानात गेल्यानेही त्याचा त्रास होतो.
सतत वाहनांचे आवाज कानांवर पडल्याने हृदयविकाराचा झटका येण्याच्या शक्यतेत वाढ होते, असे नव्या संशोधनात सिद्ध झाले आहे. गणेशोत्सवात अनेक रस्त्यांवर वाहतूककोंडी होते, त्या वेळी जोरात हॉर्न वाजवले जातात. त्यामुळे मुंबईकरांनी गणेशोत्सवात वाहने चालवताना सावधानता बाळगणे आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. जर्मनीतील ड्रेस्डेन विद्यापीठातील संशोधक आंद्रेआस सीडलर आणि सहकाऱ्यांनी या संदर्भात केलेल्या संशोधनाचे निष्कर्ष दॉइशेस आर्झटेब्लाट इंटरनॅशनल या वैद्यकीय नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे. त्यानुसार, दीर्घकाळ वाहनांचे आवाज कानांवर पडत राहिल्यास हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो हे सिद्ध झाले असून, जागतिक आरोग्य संघटना याविषयी लवकरच जागतिक अहवाल प्रसिद्ध करणार आहेत.
हृदयरोग तज्ज्ञ डॉ. पवन कुमार म्हणाले, ‘शहरामधली बदलती जीवनशैली, आहाराच्या बदलत्या व्याख्या, व्यसनाधीनता यामुळे आरोग्य धोक्यात आहे. आता ध्वनिप्रदूषणामुळे हृदयविकारांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. वाढत्या गोंगाटामुळे ऐकण्याच्या क्षमतेप्रमाणे संपूर्ण आरोग्यावर विपरित परिणाम होताना दिसतो.
ध्वनिप्रदूषणामुळे ताण निर्माण करणारे ‘कॉर्टिसॉल’ आणि ‘ड्रिनलिन’ अशा अंतस्त्रावांत वाढ होते, त्यामुळे हृदयाचे ठोके वेगाने पडतात. हृदयाचे ठोके अनियमित पडण्याचा विकार असलेल्या रुग्णांना ध्वनिप्रदूषणाची पातळी ८० डेसिबलवर गेल्यास गंभीर स्वरूपाचा झटका येण्याचा धोका वाढतो. काही रुग्णांमध्ये हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्या आकुंचन पावतात आणि त्या काम करेनाशा होतात. दीर्घकाळ वाहनांचे आवाज कानांवर पडत राहिल्यास, हृदयविकाराचा झटका येण्याचा ३ ते ५ टक्क्यांनी धोका वाढत आहे. (प्रतिनिधी)