अधिका-यांची घेणार झाडाझडती
By admin | Published: February 25, 2015 10:30 PM2015-02-25T22:30:54+5:302015-02-25T22:30:54+5:30
रायगड जिल्ह्यात एनआरएचएम अंतर्गत (राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजना) येणारा कोट्यवधी रुपयांचा निधी कसा खर्च होतो, कोणत्या कारणांसाठी खर्च होतो
अलिबाग : रायगड जिल्ह्यात एनआरएचएम अंतर्गत (राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजना) येणारा कोट्यवधी रुपयांचा निधी कसा खर्च होतो, कोणत्या कारणांसाठी खर्च होतो याबाबतची माहिती रायगड जिल्हा परिषदेच्या सभासदांना मिळत नाही. यासाठी एनआरएचएमच्या अधिकाऱ्यांची विशेष बैठक बोलवावी असे आदेश रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे यांनी दिले. बुधवारी पार पडलेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या सर्वसाधरण सभेत टोकरे बोलत होते.
एनआरएचएमचा निधी हा रायगड जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पापेक्षा कोट्यवधी रुपयांचा आहे. हा निधी आरोग्य व्यवस्थेच्या योग्य कारणांसाठी खर्च होणे अपेक्षित आहे. तो खर्च करताना त्यावर नियंत्रण असणे गरजेचे आहे. कोणत्या विभागात आरोग्य व्यवस्थेची गरज आहे. याची माहिती जिल्हा परिषद सदस्यांना अधिक असते. त्यामुळे त्यांना विश्वासात घेणे गरजेचे असून एनआरएचएमच्या अधिकाऱ्यांची यासाठी विशेष बैठक अध्यक्षांनी बोलवावी, अशी मागणी सर्व सदस्यांनी केली. एनआरएचएमच्या निधीतून काही ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारती बांधल्या आहेत. तेथे चुकीच्या पद्धतीने निधी खर्च झाल्याची तक्रार सदस्यांनी सभागृहात केली. त्याला अध्यक्ष सुरेश टोकरे यांनी मान्यता दिली.
काही ठिकाणच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक मोबाईल वापरतात. व्हॉट्सअप, फेसबुक वापरताना सरार्स शिक्षक आढळतात. त्यामुळे शिक्षकांचा वेळ त्यातच खर्च होत असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होते. त्यामुळे शिक्षकांना शाळेत मोबाईल वापरण्यास बंदी करावी, अशी मागणीही सदस्यांनी सभागृहात केली. जिल्ह्यात तंबाखूमुक्त अभियान राबवण्याची मागणीही करण्यात आली. पूरग्रस्तांसाठी आलेला १३ कोटी रुपयांचा निधी दक्षिण रायगडमध्येच खर्च करण्यात येत होता. त्या विरोधात शिवसेनेचे उत्तम कोळंबे यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केलेली आहे. निधी खर्च करण्यास न्यायालयाने स्टे दिला आहे. त्यामुळे तो निधी सरकारच्या तिजोरीत परत जाण्याची शक्यता आहे. याबाबत दाखल याचिका तांत्रिक कारणांनी परत येत नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे.