भाईंदर : शहरात डेंग्यू व मलेरिया आजार वाढत असल्याने पालिकेने विविध माध्यमांद्वारे जनजागृतीला सुरुवात केली आहे. आता अधिक प्रभाव पाडण्यासाठी पथनाटय़ व कार्यशाळांचा आधार घेतला जाणार आहे. शहरातील 289 शाळांत शनिवारपासून जनजागृतीला सुरुवात करण्यात आली.
शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढत असल्याची बाब नित्याची असली तरी डेंग्यूला कारणीभूत ठरणा:या या डासांनी मात्र उच्छाद मांडला आहे. डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येवरून हे स्पष्ट होत आहे. त्याची दखल जिल्हा प्रशासनासह राज्य शासनानेही घेतली आहे. मुंबई, ठाणो, वसई-विरारसह मीरा-भाईंदरलाही डेंग्यूबाबत संवेदनशील घोषित करण्यात आले आहे.
त्यासाठी मीरा-भाईंदर पालिकेने विविध माध्यमांसह कार्यशाळा व पथनाटय़ांद्वारे डेंग्यू व मलेरिया आजारांबाबत शहरात जनजागृतीला प्राधान्य देण्यास सुरुवात केली आहे. या जनजागृतीत शाळकरी मुलांच्या आरोग्यालाही विशेष महत्त्व देण्यात आले आहे.
शहरातील 289 शाळांत पथनाटय़े सादर करण्यात येणार आहेत. कार्यशाळाही घेण्यात येणार आहेत. त्याची सुरुवात शनिवारपासून मीरा रोड येथील शाळांतून करण्यात आली. महापालिकेच्या या उपक्रमाला रहिवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. (प्रतिनिधी)
‘शेप इंडिया’चा सहभाग
पालिकेचे प्रभारी डास नियंत्रण अधिकारी अनिल राठोड यांच्या मार्गदर्शनाखालील ‘शेप इंडिया’ या सामाजिक संस्थेद्वारे पथनाटय़ सादर करण्यात येत आहे. हिंदी, मराठी व इंग्रजी भाषांतून माहिती देण्यात येत आहे. आजारांचे गांभीर्य लोकांर्पयत पोहोचविण्यात येत आहे. काँग्रेसचे नगरसेवक जुबेर इनामदार, फरीद कुरेशी आदींनी आपापल्या प्रभागांत ही जनजागृती करण्यास प्राधान्य दिले आणि मोहिमेला हातभार लावण्याचा प्रयत्न केला. यातील काही पथनाटय़ांना आ. मुझफ्फर हुसेन यांनीही हजेरी लावली आणि पालिकेच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्याचे राठोड यांनी सांगितले.